ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा प्रकार घडल्याचे समजते. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नांदेड ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये गुगल मीट किंवा झूमद्वारे ऑनलाईन ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेसह काही विद्यार्थिनींच्या मोबाइलवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ क्लिप आल्या. महाविद्यालयातीलच विद्यार्थ्यांनी इतर व्यक्तीच्या बनावट आयडीवरून अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी दोन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून दुसऱ्याचा शोध घेतला जात आहे.
विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात ऑनलाइन क्लास सुरू असताना 1 डिसेंबर 2021 ते 10 एप्रिल 2022 दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी स्वत:ची ओळख लपवून महाविद्यालयांमधील सीस्टम जनरेट करून इंटरनॅशनल क्रमांकावरून महाविद्यालयांमधील अनेक शिक्षिका, विद्यार्थिनींना वेगवेगळ्या कंपन्यांचे संदेश, अश्लील शिवीगाळ, अश्लील फोटो व व्हिडिओ पाठविले. हा प्रकार वारंवार घडल्याने त्रस्त शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी ही बाब प्रशासनाला कळवली. महाविद्यालयातील एका शिक्षकाने नांदेड ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये रितसर तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दोन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून घेत एका विद्यार्थ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या नेतृत्त्वात या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, य सगळ्या प्रकारामुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.