पुण्यामध्ये दोन वेगवेगळ्या धरणांमध्ये बुडून एकाच दिवशी 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पहिली घटना खेड तालुक्यातील चासकमान धरणामध्ये घडली आहे तर दुसरी घटना ही भोर तालुक्यातील भाटघर धरणात घडली आहे. मृतांमध्ये दोन मुलं आणि 7 महिलांचा समावेश आहे. या घटनांमुळे एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनांचा तपास खेड आणि भोर पोलिसांकडून सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुंडाळवाडीच्या तिवई हिल येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलचे 34 विद्यार्थी शाळेला सुट्टी लागणार असल्याने शिक्षकांसह पोहण्याचा सराव करण्यासाठी गेले होते. हे विद्यार्थी तिवई हिलच्या पायथ्याशी असणाऱ्या चास कमान धरणाच्या जलाशयात पोहण्यासाठी गेले होते. काही विद्यार्थी कमरे एवढ्या पाण्यात उभे असताना अचानक एक मोठी लाट आली आणि या लाटेत 6 ते 7 विद्यार्थी पाण्यात ओढले गेले. यावेळी शिक्षकांनी तातडीने विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करत काही विद्यार्थ्यांना तीरावर आणले. पण त्यामधील 4 विद्यार्थी खोल पाण्यात बुडाले. यामध्ये दोन मुलं आणि दोन मुलींचा समावेश होता. या चौघांचा देखील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. परीक्षित अग्रवाल, रितीन डीडी, तनिशा देसाई आणि नव्या भोसले अशी मृत विद्यार्थ्यांची नावं आहेत.
तर, दुसरी घटना ही भोर तालुक्यातील भाटघर धरणात घडली आहे. या धरणामध्ये बुडून 5 विवाहित महिलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी सांयकाळच्या सुमारास घडली आहे. या पाचही महिला पुण्यामध्ये राहणाऱ्या असून त्या नातेवाईकांच्या इथे फिरायला आल्या होत्या. धरणावर फिरायला गेले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. खुशबू लंकेश रजपूत, मनीषा लखन रजपूत, चांदनी शक्ती रजपूत, पूनम संदीप रजपूत, मोनिका रोहित चव्हाण अशी मृत महिलांची नावे आहेत. यामधील मनीषा, चांदनी आणि पूनम या तिघी हडपसर येथे राहत होत्या. या घटनेमुळे राजपुत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.