ताजी बातमी ऑनलाईन टीम
मंचर पोलीस ठाण्यात सहायक फौजदार म्हणून कार्यरत असलेले एकनाथ ठकाजी वाजे (वय ५३) यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. २५) दुपारच्या सुमारास राजगुरुनगरजवळील चांडोली येथे घडली आहे. याबाबतची माहिती त्यांचे जावई आदित्य रवींद्र गभाले (वय २५, रा. मुक्ताई नगर नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी राजगुरुनगर पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत माहिती अशी की, आदित्य रवींद्र गभाले यांची पत्नी सुप्रिया या सोमवारी (दि. २३) माहेरी चांडोली (ता. खेड) येथे आई-वडिलांकडे गेल्या होत्या. बुधवारी (दि. २५) आदित्य यांची पत्नी सुप्रिया हिने त्यांना फोन करून वडील एकनाथ वाजे यांनी शेजारी असणाऱ्या मोकळ्या १३ नंबर फ्लॅटमध्ये स्वतःला कोंडून घेतले असून, आम्ही बराच वेळ दरवाजा वाजूनही ते दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास फ्लॅटचा दरवाजा तोडून आत जाऊन पाहिले असता एकनाथ वाजे यांनी बेडरूममधील हुकाला रस्सी बांधून गळफास घेतल्याचे दिसले.
एकनाथ वाजे यांचा गळफास सोडून त्यांना ग्रामीण रुग्णालय चांडोली येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. वाजे यांच्या आत्महत्येचे कारण समजले नसून याबाबत खेड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आली आहे. या घटनेचा तपास पोलिस जवान घोलप करत आहेत. सहायक फौजदार एकनाथ वाजे यांच्या मागे पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.