काम आहे, असे फोनवरून सांगून बोलावून घेऊन अरबाज मेहबूब पटेल (वय 19,रा.जुना बुधगाव रोड, फकीर मळा, कुपवाड) या तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी ऋषिकेश वाघमारे, अरबाज जमादार (दोघे रा.हनुमाननगर, कुपवाड) या दोघांविरोधात कुपवाड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जखमी अरबाज पटेल याला रविवारी रात्री संशयित अरबाज जमादार याने फोन करून ‘माझे तुझ्याकडे काम आहे, असे सांगून पटेल याला कुपवाड एमआयडीसीतील स्मशानभूमीजवळ बोलावून घेतले. पटेल आल्यावर संशयित ऋषिकेश वाघमारे याने पटेल याच्यावर कोयत्याने डोक्यात, हातावर वार केले. पटेल जमिनीवर पडल्यावर संशयित अरबाज याने त्याला काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत पटेल जखमी झाल्याचे दिसून येताच संशयित फरार झाले. जखमी अवस्थेत पटेल याने नातेवाईकांना माहिती दिली. नातेवाईकांनी तातडीने जखमीला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.