देशावर असलेले कोरोनाचे (Corona Virus) सावट अद्याप दूर झाले नाही. कोरोनाबाबतची (Covid-19) भीती कायम असून आता पुन्हा कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. देशात पुन्हा कोरोना रुग्णसंख्या (Corona Patient) वाढत असून गेल्या आठवड्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. ऐवढंच नाही तर साप्ताहिक संसर्ग दरही वाढला आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता केंद्र सरकार (Central Government) सतर्क झाले असून हालचालींना वेग आला आहे. केंद्र सरकारने पाच राज्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोरपणे लक्ष ठेवण्याचे आणि आवश्यक ती खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Union Health Secretary Rajesh Bhushan) यांनी तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांना पत्र लिहित सूचना दिल्या आहेत. या पत्रात त्यांनी असे म्हटले आहे की, देशातील काही राज्यांत कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. ज्यामुळे संसर्गाचा प्रसार वाढण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. तसंच कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलावीत असे आदेश या पत्राद्वारे देण्यात आले आहेत.
राजेश भूषण यांनी पुढे सांगितले की, ‘सार्वजनिक आरोग्य प्रतिसादावर जोखीम मूल्यांकन आधारित दृष्टिकोन अवलंबण्याची आवश्यक्यता आहे. त्याचसोबत, कोरोनाशी लढताना आतापर्यंत मिळालेलं यश गमावलं जाऊ नये. पत्रात त्यांनी गेल्या तीन महिन्यांत देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाल्याचा उल्लेखही केला आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या विविध सूचनांचे पालन करताना या राज्यांना कोरोनासाठी झटपट आणि प्रभावी व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजनांचे निरीक्षण आणि अंमलबजावणी सुरू ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, सर्वाधिक रुग्णांची वाढ तामिळनाडूमध्ये झाली असल्याचे या पत्रात नमूद केले आहे. केंद्रीय सचिव भूषण यांनी पत्रात नमूद केले आहे की, मागच्या आठवड्यात राज्यातील कोरोना संसर्गाचं प्रमाण 5.2 टक्क्यांवरून 7.8 टक्क्यांवर पोहोचले आहे. महाराष्ट्रात, 27 मे रोजी संपलेल्या आठवड्यात 2,471 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर 3 जून रोजी संपलेल्या आठवड्यात ही संख्या 4,883 इतकी होती. याशिवाय, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये या कालावधीत साप्ताहिक संसर्गाच्या प्रकरणांमध्येही मोठी वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांची वाढ लक्षात घेता आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे सांगण्यात आले आहे.