जयसिंगपुर येथे गेल्या दोन महिन्याच्या संघर्षानंतर गल्ली क्र 10 ते 13 मधील रस्त्यावर भाजीपाला विकणाऱ्या विक्रेत्याना भाजी मंडईत बसण्याची शिस्त लावली असताना आठ दिवसही विक्रेते मंडईत बसले नाही. त्यामुळे जयसिंगपुरात पुन्हा रस्त्यावर बाजार भरला असल्याचे चित्र दिसत आहे. असे असताना याकडे पालिकेने गंधारिची भूमिका घेतल्याने व्यावसायिक व्यापाऱ्यांतुन तीव्र नाराजी होत आहे.
येथील पालीकेने नांदणी रोडवर लाखो रुपये खर्च करून प्रशस्त भाजी मंडई उभारुन दहा वर्षे झाली आहे. शहरातील मंडईत एकत्र भाजीपाला विक्रेते विक्रीसाठी बसल्यास सर्व नागरिक भाजीपाला खरेदीसाठी भाजी मंडईतच जात होते. दरम्यान, कोरोनाच्या काळामुळे पालिकेने भाजीपाला विक्रेत्याना विविध ठिकाणी बसण्याचा सूचना केल्या होत्या. मात्र, कोरोना गेल्यानंतरही गल्ली न 11 ते 13 या परिसरात रस्त्यावर विकणारे भाजीपाला विक्रेते आपली जागा सोडून ते मंडईत जाण्यास तयार नाहीत.