ताजी बातमी ऑनलाईन टीम
सांगली; वारणा पट्ट्यातील अनेक गावांत शनिवारी पहाटे आणि दिवसभर मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. तसेच वाळवा तालुक्यासह जिल्ह्यातील काही भागात सरी कोसळल्या. मात्र खरीप पेरणीसाठी हा पाऊस पूरक नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
इस्लामपूर : वाळवा तालुक्यात सर्वच भागात पाऊस झाला. पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. तालुक्यातील पश्चिम भागातील येलूर, इटकरे, येडेनिपाणी, कुरळप, ऐतवडे खुर्द, कुरळप, चिकुर्डे या परिसरात जोरदार पाऊस झाला. मात्र वाटेगाव, नेर्ले, कासेगाव, पेठ, इस्लामपूर आदी परिसरात हलका पाऊस झाला. या पावसाने गेले काही दिवस उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
शिराळा : शिराळा तालुक्यातही ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. तालुक्यात बहुसंख्य भागात खरीप पिकांची पेरणी झाली आहे. त्यामुळे पिकांच्या उगवणीसाठी शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.