ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर ; राज्यसभा निवडणुकीत भाजपने दगाफटका करून शिवसेनेच्या पाठीवर वार केला आहे. संजय पवार यांच्या पराभवाची सल कायम राहील. शिवसैनिक पवार यांच्या पराभवाचा बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच पवार यांना चांगल्या पदाची संधी देतील, असेही क्षीरसागर यांनी सांगितले. शिवाजी पेठेतील निवृत्ती चौक येथे शिवसेना विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, शहरप्रमुख जयवंत हारुगले, हर्षल सुर्वे, रणजित जाधव, अरुण सावंत यांची भाषणे झाली. अंकुश निपाणीकर यांनी प्रास्ताविक केले.
शहरातील शिवाजी पेठ ही एक वेगळी शक्ती आहे. या पेठेतूनच शिवसेनेला उभारी मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीत दोनवेळा पेठेने मताधिक्य दिले आहे. यापूर्वी पेठेसाठी कोट्यवधींचा निधी दिला आहे. गांधी मैदानात पावसाचे पाणी साठत असल्याने खेळाडूंना सराव करता येत नाही. नगरविकास विभागाकडून साडेसात कोटींचा निधी आणून ही समस्या सोडवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.