देशात सध्या आर्थिक मंदी येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या महागाईमुळे जनतेला आता चटके सोसावे लागत आहे. अशातच इंधनाचे दर आता गगनाला भिडू लागले आहेत. वाढत्या इंधन दरवाढीवर पर्याय म्हणून भारतात आता ‘गो ग्रीन’ ही संकल्पना राबवण्यास सुरुवात झाली आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांचा काळ आता सुरु झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यातच आता इलेक्ट्रिक वाहनांच्या कंपन्यांमध्ये देखील स्पर्धा सुरु झाली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती जास्त असल्यामुळे जी कंपनी स्वस्तात मस्त गाडी तयार करेल अशा कंपनीकडे ग्राहकांचा झुकता कल आहे. हळूहळू स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात लाँच होऊ लागल्या आहेत. भारतात सध्य स्थितीमध्ये टाटा कंपनीची टाटा टिगॉर ही कार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार म्हणून ओळखली जात आहे. या कारची किंमत 12.49 लाख रुपये इतकी आहे. असं असलं तरी सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांना परवडेल अशा किंमतीमध्ये एक स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच होणार आहे.
ईव्ही स्टार्टअप कंपनी पीएमव्ही इलेक्ट्रिक (PMV Electric) जुलैमध्ये देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ईएएस-ई (EaS-E) लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कंपनी EAS-E इलेक्ट्रिक कार ही 4 ते 5 लाख रुपयांच्या किंमतीमध्ये असणार आहे. 2 हजार रुपयांच्या रिफंडेबल टोकन अमाऊंटसह युझर्स ही कार बुक करू शकतात.
EAS-e इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जवर 160 किमीपर्यंतची रेंज देऊ शकते असं कंपनीने म्हटलं आहे. यासोबतच या कारमध्ये 10 kWh ची लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरी, 3 kW AC चार्जर, क्रूझ कंट्रोल, रिमोट पार्किंग असिस्टंट, स्टीअरिंग माउंटेड कंट्रोल, रिमोट कीलेस एंट्रीसारखे फीचर्स मिळतील.