बँकेत नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल बँकिंग (IBPS) नं लिपिक पदासाठी भरती घोषणा केली आहे आणि इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. लिपिक पदासाठी 1 जुलैपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 जुलै असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ibps.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.
अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, यूको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक लिपिक पदांसाठी 6035 जागांची बंपर भरती होणार आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार इच्छुक उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांनी अर्ज करावा. वयोमर्यादेबद्दल बोलायचं झालं तर किमान 20 वर्ष आणि कमाल 28 वर्ष असावी. IBPS लिपिक भरतीची प्राथमिक परीक्षा 2022 अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरात लवकर घेण्यात येईल.
IBPS परीक्षा कॅलेंडर नुसार ही लिपिक भरती परीक्षा 28 ऑगस्ट, 3 आणि 4 सप्टेंबर 2022 रोजी घेतली जाईल. IBPS लिपिक भरती पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना नंतर मुलाखतीसाठी बोलवले जाईल. या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या आधारावर केली जाणार आहे.
उमेदवारांना इंग्रजी, संख्यात्मक क्षमता आणि तर्क क्षमता या विषयांतून 100 गुणांचे 100 प्रश्न विचारले जातील असं परीक्षेचं स्वरूप असेल. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 850 रुपये अर्ज शुल्क असेल तर SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 175 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.