गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने राज्यात चांगलाच जोर धरला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोपडून काढले आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. या पूरामध्ये ट्रकसह 6 जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीमध्ये घडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गडचिरोलीत पूर आला आणि या पूरात ट्रकसह 6 जण वाहून गेले.
या सहा जणांपैकी तिघांचे मृतदेह सापडले तर तिघांचा शोध सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. या पूरामुळे अहेरी तालुक्यातील पेरमिली गावालगतच्या नाल्यावर असलेला पूल पाण्याखाली गेला. शनिवारी सकाळी पुलावरुन पूराचे पाणी वाहत असल्यामुळे ट्रक चालक पुलाच्या अलिकडेच थांबून होता. पण रात्री पाणी कमी झाले असे वाटल्यामुळे चालकाने ट्रक पाण्यात घातला. ट्रक चालकाचा हा अंदाज चुकला आणि पाण्याच्या वेगाने ट्रक वाहून गेला