ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर; परीक्षा देऊनही काही विद्यार्थी गैरहजर आणि पेपर लिहूनही काहींना शून्य गुण, असा सुमारे 500 विद्यार्थ्यांचा चुकीचा निकाल शिवाजी विद्यापीठाने दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, महाविद्यालयांचा गोंधळ उडाला आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षेतील कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचे अंतिम वर्षाचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये हा भोंगळ प्रकार उघडकीस येताच विद्यापीठाकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर विद्यापीठाने सारवासारव करण्याच्या प्रयत्नात जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांकडून संबंधित विद्यार्थ्यांची माहिती मागविण्याचे काम तातडीने सुरू केले आहे.
आता तीन दिवसांत निकालात दुरुस्ती करून पुन्हा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. पदवी व पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे, यासाठी हा अंतिम वर्षाचा निकाल बुधवारी तातडीने जाहीर केला. मात्र, या घाईमध्ये इंग्रजी, विज्ञान, गणित, संख्याशास्त्रासह अन्य विषयांच्या 10 टक्के विद्यार्थ्यांच्या निकालात चुका झाल्याचे समोर आले आहे.