मागील तीन वर्षात कोरोना आणि त्यानंतर दोन महापुरांमुळे जिह्यातील व्यापार-व्यवसायाला आलेली मरगळ आता दसरादिवाळी निमित्ताने दूर होईल अशी आस व्यावसायिकांना आहे. जिह्यात पुढील महिन्याभरात किमान 1200 कोटी रुपयांची अतिरिक्त उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक बाजारपेठेला ऑनलाईन खरेदीचे मोठे आव्हान असले तरी वाहनखरेदी गृहप्रकल्प, सोने खरेदी, किराणा आणि कपडे व्यवसायिकांना पुढील काही महिन्यात व्यावसायवृध्दी होईल, असे तज्ञ सांगतात. गणेश उत्सव धुमधडाक्यात साजरा झाला. दस्रयानिमित्ताने बाजारपेठा सजल्या आहेत. पुढील महिन्याभरातील महाउत्सवातील मुहूर्त कॅश करण्यानिमित्ताने ग्राहकाची पावले आतापासूनच बाजारापेठेकडे वळत असल्याचे शुभवर्तमान आहे.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापारीवर्गाने वेगवेगळ्या सवलतींच्या योजना देऊ केल्या आहेत. केवळ दसराच नव्हे तर दिवाळी व लग्नग्नसराईसाठी देखील आतापासूनच खरेदीची सुरूवात होईल. एलईडी टीव्ही, फ्रीज, वातानुकूलित यंत्र, ओव्हन, सीडी, एलसीडी, संगणक यासारख्या वस्तू खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. वाहनांची आगाऊ नोंदणी मोठय़ा संख्येने होत आहे. कागदपत्रांची पूर्तता करून ही वाहने दसरयाला घरी नेली जातील. कापड मार्केटही चांगलेच तेजीत आले आहे. बाजारातही आकर्षक योजनांव्दारे ग्राहकांना आकर्षीक केले जात आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी झीरो डाउन पेमेंट, ईएमआय, शून्य टक्के व्याजासह कर्ज आदी सुविधाही देण्यात आल्या आहेत. मोठी मल्टिपल शोरूम आणि ईकॉमर्स ऑनलाईन खरेदीचे मोठे आव्हान स्थानिक व्यावसायिकांना आहेत. लक्ष्मीपूरी, राजारामपूरी, शाहूपूरी, स्टेशन रोड, गुजरी, महाव्दार रोड आदी नेहमीची बाजारपेठ सणासुदीसाठी सज्ज असतानाच शहरातील विविध मॉलमध्येदेखील आकर्षक सवलती उपलब्ध आहेत. दसरयाला ग्राहक गृहखरेदीला प्राधान्य देण्याची शक्यता गृहीत धरून बांधकाम व्यावसायिकांनीही गृहखरेदीवर आकर्षक सवलत देऊ केली आहे.
बाजारपेठेत उत्साह
तीन वर्षानंतर बाजारपेठेत उत्साह दिसत आहे. यंदाच्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने उसाचे पिक जोमदार आहे. उसाच्या एफआरपीसह इतर पिकांचे पैसे बळीराजाला मिळाले आहेत. मागील तीन वर्षातील खोळंबलेली खरेदी यंदाच्या वर्षी होईल याचे चित्र गणेशोत्सवातच दिसले. खासकरुन सोने, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे आणि किराणा व्यापारात तेजी दिसेल. हा खरेदीचा टप्पा 1200 कोटीपेक्षा अधिकचा होईल.
एफआरपीचे सहा हजार कोटी राज्यातील कारखान्यांनी 42 हजार 11 कोटी 18 लाख रूपये एफआरपीचे अदा केले आहेत. कोल्हापूर जिह्यात यातील सुमारे सहा हजार कोटी रुपये आले आहेत. कोल्हापूरच्या बाजारपेठेतील उलाढालीचा शेतकरी हाच मोठा केंद्रबिंदू आहे. नोकरदार मंडळीकडून गुंतवणुकीच्या निमित्ताने अधिक उलाढाल होते. तीन वर्षानंतर अनेक खासगी कंपन्याकडून बोनस मिळण्याची शक्यता आहे. याचाही कोल्हापूरच्या बाजारपेठेवर परिणाम होणार आहे.





