ताजी बातमी ऑनलाईन टीम
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रौत्सवाच्या काळात २३ लाख ३१ हजार ६०४ भाविकांनी दर्शनासाठी उपस्थिती लावली होती. तर ४२ लाखांहून अधिक लोकांनी देवीचे ऑनलाईन दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीकडे झाली आहे. दरम्यान, सुमारे १३ लाख रुपयांच्या लाडूप्रसादाची विक्री झाली.
मंगळवारी अंबाबाई मंदिरात खंडेनवमीनिमित्त विविध धार्मिक व पारंपरिक कार्यक्रम झाले. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.मंगळवारी श्री अंबाबाई देवीची ‘विश्वेश्वरी जगद्धात्री’ या रूपात पूजा बांधण्यात आली होती. दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. भाविकांच्या बंदोबस्तासाठी २४ तास कार्यरत असणाऱ्या पोलिसांना व मंदिरातील कर्मचाऱ्यांना इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर तर्फे अध्यक्षा डॉ. सौ. विद्या पठाडे यांच्या अल्पोपाहाराचे वाटप करण्यात आले.
यावेळी कामिणी हेगिष्ट, दीपा जाधव, मनीषा चव्हाण, हेमा भोसले, रुपाली बाड, प्रियंवदा घोरपडे, कुंदा सरनोबत आदी उपस्थित होत्या. हिल रायडर्स एडव्हेंचर फौंडेशन संस्थेतर्फे जुना राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारास (नगारखाना) मंगल तोरण बुधवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता बांधण्यात येणार आहे.