कोल्हापूर शहरात सध्याच्या घडीला सर्वात मोठी समस्या कोणती असेल तर ती म्हणजे खराब रस्ता. शहरातील 460 किलोमीटरच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. हे चित्र बदलले पाहिजे. दर्जदार रस्ते होणे आवश्यक आहे. मात्र, महापालिकेच्या आर्थिक स्थितीमुळे हे होवू शकत नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्यशासनाने विशेषबाब म्हणून कोल्हापुरात दर्जदार रस्त्यांसाठी तातडीने 1 हजार कोटींचा निधी देण्याची गरज आहे. यासाठी राजकीय इच्छाशक्ती आवश्यक असून जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून एकजुटीने प्रयत्न केल्यास हे शक्य आहे. कोल्हापूर शहरामध्ये रस्त्यांची दयनीय स्थिती झाली आहे. विशेषतः सर्वच मुख्य मार्गावर खड्डय़ांचे साम्राज्य आहे.
शहरातील नागरिकांना याचा त्रास होतच आहे. शिवाय अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांनाही खराब रस्त्यांचा नाहकत्रास होत आहे. एकंदरीत खराब रस्त्यांमुळे कोल्हापूर शहराची प्रतिमा खराब होत आहे. एकीकडे प्रशासन कोल्हापूरचे पर्यटन, धार्मिक पर्यटनामध्ये अग्रेसर होण्यासाठी प्रयत्न करत आहे. शाही दसरा देशपातळीवर नेण्यासाठी धडपड करत आहे. दुसरीकडे मात्र, खराब रस्ते, पार्कीगचा बट्याबोळ हे कळीचे मुद्दे ठरत आहेत. भाविक, पर्यटकांना कोल्हापुरात आल्यानंतर किमान पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. विशेषतः रस्ते सुस्थितीत असणे आवश्यक आहे. मात्र, हेच होताना दिसून येत नाही.
एकाचवेळी सर्व रस्ते होणे आवश्यक
महापालिकेची आर्थिक स्थिती खराब असल्याने शहरातील एकाचवेळी सर्व रस्ते केले जात नाहीत. निधी जसा उपलब्ध होईल, तसे रस्ते केले जातात. परिणामी एक रस्ता होईपर्यत दुसरा रस्त्यावर खड्डे पडलेले असतात. यावर पर्याय म्हणजे एकदाच सर्व रस्ते नव्याने करणे. त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विशेषबाब म्हणून कोल्हापूर महापालिकेला भरघोस निधी देण्याची गरज आहे.
वर्षात रस्त्यांसाठी 80 कोटींचा निधी
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना वर्षात महापालिकेला 80 कोटींचा निधी मिळाला. यामध्ये रस्त्याबरोबर तेथील गटारी आणि सांस्कृतिक हॉलची उभारणीची कामे केली जात आहेत. नगरोत्थानच्या 100 कोटींच्या निधीची प्रतिक्षा बहुतांशी अंतर्गत रस्ते सुस्थितीत आहेत. मात्र, अमृत योजनेतील पिण्याची पाईपलाईन, ड्रेनेजलाईनसाठी खुदाई केल्याने मुख्य रस्ते खराब झाले आहेत. राज्य शासनाकडे शहरातील रस्त्यांसाठी नगरोत्थान योजनेतून 278 कोटींचा निधीची मागणी केली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 100 कोटींच्या निधीची मंजूर अंतिम टप्प्यात आहे. या निधीतून शहरातील 30 किलोमीटरचे रस्ते होतील.