रविवारी रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरने 100 धावा करत शानदार शतक झळकावले आणि भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी केली आहे.प्रथम फलंदाजी करताना प्रोटीज संघाने 50 षटकात 278 धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी 279 धावांच्या लक्ष्य ठेवले. या लक्ष्या पाठलाग करताना भारतीय संघाने 7 गडी राखून विजय मिळवला. भारताकडून इशान किशनने 93 धावांची मोठी खेळी खेळली तर श्रेयस अय्यरने वनडे कारकिर्दीतील दुसरे शतक पूर्ण केले. या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणार आहे.
तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि क्विंटन डी कॉक आणि येनेमन मलान 40 धावांवर बाद झाले. यानंतर रीझा हेन्रिक्स आणि एडन मार्कराम यांनी डाव सावरला आणि संघाला 150 च्या पुढे नेले. दोघांनीही शानदार खेळी सुरू ठेवत आपापली अर्धशतके पूर्ण केली. परंतु मोहम्मद सिराजने ही भागीदारी मोडून काढली आणि हेन्रिक्सला शाहबाजकरवी झेलबाद केले. यानंतर हेन्री क्लासेन आणि मार्कराम यांनी पुन्हा डाव सावरला आणि संघाला 200 च्या पुढे नेले. क्लासेल बाद झाल्यानंतर मिलरने 35 धावा करत दक्षिण आफ्रिकेला 278 धावांपर्यंत पोहोचवले.