ताजी बातमी ऑनलाईन टीम
सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आतापासूनच कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये भाजप सर्वांत पुढे असून, अनेक केंद्रीय मंत्री कामाला लागले आहे. यातच । शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष पुढच्या टप्प्यावर जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले असून, हे भाजपचे षड्यंत्र असल्याचा आरोप केला जात आहे.
शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजपला तगडी टक्कर देऊन शह देण्यासाठी आधीच सर्व विरोधक एकत्रित येण्यासाठी विशेष रणनीति आखत आहेत. त्यात आता शिवसेनाही सहभागी होणार असून, उद्धव ठाकरे यांना आता राष्ट्रीय पातळीवरील विरोधकांपैकी एक प्रमुख नेते बनवण्याबाबत मातोश्रीवरून हालचाली सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
पक्षाच्या निवडणूक चिन्हावरून उद्धव ठाकरेंची शिवसेना ही शिंदे गटाविरोधात दीर्घकाळ कायदेशीर लढाई लढण्यासाठी सज्ज झाली आहे. भाजपच्या हुकूमशाही राजकारणाचा ‘बळी’ म्हणून आता उद्धव ठाकरे यांना जनतेसमोर मांडले जाणार आहे. यासाठी मातोश्रीवरून मेगा प्लान केला जात आहे. या स्मार्ट खेळीने उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय पातळीवर नेऊन भाजपसमोर आणखी एक आव्हान उभे केले जाणार असल्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरेंना देश पातळीवर शरद पवार, ममता बॅनर्जी, नितीशकुमार आणि अखिलेश यादव या नेत्यांच्या रांगेत नेऊन बसवण्याविषयी रणनीति आखली जात आहे. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील जनतेची मोठ्या प्रमाणावर सहानुभूती मिळेल.
मुघलांच्या काळात मराठ्यांनी दिल्लीचे तख्त हादरवले होते. तसेच आव्हान आताच्या दिल्लीलाही मिळेल. केंद्र सरकार विविध यंत्रणांचा दुरुपयोग करत असल्याने भाजपविरोधात नागरिकांमध्ये रोष आहे. यामुळे नागरिकांचे मत भाजपविरोधात जाईल, असा मोठा दावा शिवसेनेतीलच एका नेत्याने केले आहे.
खरी शिवसेना कुणाची? याचा निकाल लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरूपात । चिन्ह गोठवण्याचा हा आदेश दिला आहे.




