कोल्हापुरात आज पहाटेपासूनच परतीच्या पावसाचे आगमन झाले. सकाळपासूनच आज शांत वाऱ्यासह पावसाच्या सरीचा आनंद शहरवासीयांना अनुभवता आला. तर जिल्ह्यात विजांच्या कडकटासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. पावसाने हातकणंगले तालुक्याला झोडपून काढले आहे. खोचीसह परिसरात पिकाचे नुकसान झाले आहे. पावसामुळे भागातील सर्व शेत जमिनीत पाणी साचले असून यामुळे मळणीसाठी काढलेला सोयाबीन, तोडणीसाठी काढलेल्या भुईमूग शेंगा पाण्यात वाहू लागल्या आहेत.
भात पीके जमिनीशी लोटांगण घेत आहे.ऊस,मका पिके झुकले आहेत.त्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.आज शेतीचे भूमिपूजन असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.शेतीत भूमिपूजन कुठे करायचे असा प्रश्न त्याला पडला आहे.अनेक शेतकरी भूमिपूजन करण्याच्या तयारीत आहेत.पण शेतात पाणी असल्याने त्यांना भोम पुरण्यासाठी अडथळे येत आहेत.अनेक ठिकाणी पाणी साठून गल्ली बोळातील रस्ते बंद झाले होते त्या ठिकाणचे हळूहळू पाणी कमी होऊन रस्ते सुरळीत होऊ लागले आहेत.
तर रहदारीच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साठले आहे.त्यामुळे त्यातून मार्ग काढावा लागत आहे.या प्रचंड पडलेल्या पावसाच्या पाण्यामुळे गावाबाहेरील प्रत्येक गावाला जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी जेथे ओढे आहेत त्या ठिकाणी प्रचंड पाणी वाहत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सध्या वाहतूक बंद झाली आहे.ज्यावेळी पाऊस कमी येऊन पाणी कमी होईल.त्यावेळेस सदर रस्ते वाहतुकीस खुले होणार आहेत.अनेक ठिकाणी विजांच्या कडकडामुळे विद्युत वाहक तारा तुटले आहेत त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे.वीज कर्मचारी सदर पावसातही वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहेत.
इचलकरंजी, इंगळी, पट्टणकोडोली मार्गावरील वाहतूक ठप्प
इचलकरंजी परिसरासह हातकणंगले तालुक्यात आज पहाटेपासून मुसळधार पावसाने झोडपले. अनेक मार्गावर पाणी आले असून वाहतूक ठप्प झाली आहे. रुई कबनूर रस्त्यावर पद्मावती पेट्रोल पंप लगत रस्त्यावर सुमारे तीन फूट पाणी आले आहे. त्यामुळे इचलकरंजी, इंगळी, पट्टणकोडोली या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. इचलकरंजी- शहापूर रस्त्यावरही पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे तर हातकणंगले इचलकरंजीला मार्गावर नव्याने बांधण्यात आलेल्या रेल्वे पुला नजीकचा ब्रिज पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.