कुरुकली (ता. करवीर) येथील भोगावती महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या नियोजित भोगावती कॉलेज ते रायगड” शिवविचार जागर पदयात्रा” मोहिमेला सोमवारी भोगावती महाविद्यालयातून सुरुवात झाली. मोहिमेचे हे तिसरे वर्ष असून यामध्ये महाविद्यालयाचे अनेक आजी माजी विद्यार्थी सहभागी झाले आहेत. हळदी ता करवीर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन त्यांनी अभिवादन केले.
भोगावती महाविद्यालयात प्रा. शितल माळकर यांच्या हस्ते मोहिमेचा प्रारंभ झाला. एकूण बारा दिवस चालणाऱ्या या मोहिमेत कुरुकली ते रायगड हे तीनशे किलोमीटरचे अंतर विद्यार्थी पायी पूर्ण करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला व्हावी. त्यांच्या इतिहासातून तरुणांनी प्रेरणा घ्यावी यासाठी व शिव विचारांचा जागर करण्यासाठी ही मोहीम सुरू केली असल्याची माहिती मोहिमेचे प्रमुख व भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बबनराव पाटील यांनी दिली.
यावेळी भोगावती शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, संचालक मच्छिंद्रनाथ पाटील, सरदार पाटील, बबन पाटील, प्राचार्य डॉ. डी. ए.चौगले, माजी प्राचार्य डॉ. दिनकर पाटील, उपप्राचार्य आर.बी. हंकारे, भोगावती कारखान्याचे संचालक प्रा. डॉ. सुनील खराडे, पी.एस. पाटील, प्रा. अनिल पाटील, अजित कांबळे, प्रा. राहुल लहाने, प्रा.उदय पाटील, प्रा. डॉ. संजय साळोखे, उत्तम पाटील यांच्यासह प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.