ताजी बातमी ऑनलाईन टीम
नाशिक शहरासह ग्रामीण भागांमध्ये दरोडेखोरांची दहशत वाढत चालली आहे. दिवसेंदिवस नाशिकमध्ये दरोड्याच्या घटना समोर येत आहेत. अशामध्ये शुक्रवारी नाशिक शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये दरोड्याची घटना घडली. अंबड लिंक रोड परिसरातील घरामध्ये घुसून दरोडेखोरांनी धारधार शस्त्राने वृद्धाची हत्या करुन घरातील लाखोंची रक्कम लंपास केली. बच्चू सदाशिव कर्डीले (68 वर्षे) असे हत्या झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉईंट येथे दरोडेखोरांनी बच्चू सदाशिव कर्डीले यांच्या घरावर दरोडा टाकला. बच्चू कर्डीले हे शेतातील घरामध्ये राहत होते. शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास चार ते पाच दरोडेखोरांनी घरामध्ये घुसून त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी बच्चू कर्डीले हे घरामध्ये एकटेच होते. त्यांच्या घरातील सर्वजण नातेवाईकाच्या घरी लग्न असल्याने हदळीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. याचा फायदा घेत दरोडेखोरांनी त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ल्या केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. बच्चू कर्डीले यांच्या घरातील लाखोंची रक्कम घेऊन दरोडेखोर फरार झाले.
दरोडेखोरांनी हल्ला केला त्यावेळी बच्चू कर्डीले हे झोपण्याच्या तयारीमध्ये होते. दरोडेखोरांनी हल्ला केला असता त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण दरोडेखोरांनी त्यांच्यावर धारधार शस्त्राने वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. बच्चू कर्डीले यांच्या घरातील पाच ते दहा लाख रुपयांची रोकड दरोडेखोरांनी लंपास केली. या घटनेची माहिती मिळताच नाशिकच्या अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बच्चू कर्डीले यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.