राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरांवर सक्तवसूली संचलनालयाने छापे टाकले. कागल आणि पुण्यात असेलेल्या मुश्रिफ यांच्या मालमत्तांवर ही कारवाई झाली. या कारवाईनंतर जिल्हयातील वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. कॉंग्रेस पक्षाचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनीही हसन मुश्रिफ यांच्यावर केलेली कारवाई अत्यंत चुकिची असून ती निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “केवळ सूडबुद्धीने केलेली ही कारवाई निश्चितच निषेधार्ह असून महाविकास आघाडीच्या आमदारांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न भाजपाकडून अशा खेळी करून केला जात आहे. आमदार मुश्रीफ यांच्यावर झालेली ईडीची कारवाई झाली हा सर्व प्रकार पूर्व नियोजित होता हे स्पष्ट आहे. ईडी सारख्या केंद्रीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने कसा वापर केला जातो, याचे आजची ही कारवाई म्हणजे एक उदाहरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.” असे ते म्हणाले.