आयपीएलच्या १४ व्या हंगामात आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ( DCvsRR ) यांच्यात सामना रंगणार आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार संजू सॅमसनचा हा निर्णय कार्तिक त्यागी आणि चेतन साकरियाने सार्थ ठरवत दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात माघारी धाडले.
कार्तिक त्यागीने शिखर धवनचा ८ धावांवर त्रिफळा उडवला तर चेतन साकरियाने पृथ्वी शॉला १० धावांवर बाद केले. दिल्लीला पाठोपाठ दोन धक्के बसल्याने पॉवर प्लेमध्ये त्यांच्या धावगतीला खिळ बसली. त्यांना ६ षटकात ३६ धावांपर्यंतच मजल मारता आली.
आजी – माजी कर्णधारांची अर्धशतकी भागीदारी ( DCvsRR )
पॉवर प्लेमध्ये पिछाडीवर पडलेल्या दिल्लीला सावरण्यासाठी दिल्लीचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर आणि आजी कर्णधार ऋषभ पंत यांनी कंबर कसली. या दोघांनी धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न करत ९ षटकात संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. अय्यर आणि पंतने तिसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली.
या दोघांच्या भागीदारीमुळे दिल्लीने १० षटकात ७५ धावांचा टप्पा पार केला. ही जोडी दिल्लीला चांगली धावसंख्या उभारुन देणार असे वाटत असतानाच मुस्तफिजूरने दिल्ली कर्णधार ऋषभ पंतचा २४ धावांवर त्रिफळा उडवून दिला. यामुळे ६१ धावांची भागीदारी करणारी अय्यर – पंत जोडी फुटली.
पंत बाद झाल्यानंतर अय्यरवर दिल्लीचा डाव पुढे नेण्याची जबाबदारी आली. मात्र अर्धशतकाजवळ पोहचलेल्या अय्यरला राहुल तेवातियाने ४३ धावांवर बाद करत दिल्लीला चौथा धक्का दिला. श्रेयस अय्यर बाद झाल्यामुळे दिल्लीचे शिमरोन हेटमायर आणि ललीत यादव हे दोन नवे फलंदाज क्रिजवर होते.
या दोघांनी १५ व्या षटकात दिल्लीचे शतक धावफलकावर लावले. अखेरची काही षटके राहिली असताना हेटमायरने आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. त्याने दिल्लीची धावसंख्या झपाट्याने वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुस्तफिजूरने त्याला २८ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
हेटमायर बाद झाल्यानंतर अक्षर पटेल आणि जयंत यादव यांनी दिल्लीच्या धावसंख्येला टेकू देण्याचा प्रयत्न केला. अखेर दिल्लीने १५० धावांचा टप्पा पार केला. दिल्लीने २० षटकात ६ बाद १५४ धावांपर्यंत मजल मारली.