चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या खून केल्या प्रकरणी सिध्दाप्पा भिमाप्पा शिवगौंड (रा.शेगुंशी, ता. बबलेश्वर, जि. विजापुर) याच्या विरोधात विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सुदिप बसवराज बन्नटे (बसवन्न, ता. बागेवाडी, जि. विजापूर, राज्य कर्नाटक) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना विट्यातील जुना वासुंबे रस्त्याच्या तलावाजवळ गुरुवारी (दि.३) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. भाग्यश्री सिध्दाप्पा शिवगौंड (वय २५) असे मृत पत्नीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, विट्यातील जुना वासुंबे रस्त्याच्या तलावाजवळ मोल मजूरी करणारी काही कुटुंबे राहतात. यातच मूळचा विजापूर येथील सिद्धाप्पा शिवगौंड हा देखील आपली पत्नी भाग्यश्रीसह काही दिवसांपूर्वी येथे राहण्यासाठी आलेला आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सिद्धाप्पा आणि त्याची पत्नी भाग्यश्री यांच्यात वादावादी सुरू झाली. याच वेळी सिद्धाप्पाने पत्नी भाग्यश्री हिच्यावर चारित्र्याचा संशय घेत मारहाण केली. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी तात्काळ संतापलेल्या सिद्धाप्पाला बाजूला काढून तेथून पिटाळून लावले आणि त्याची पत्नी भाग्यश्री हिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र, रात्री सव्वा आठच्या दरम्यान मेंदूतून अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. याबाबत सिद्धाप्पा शिवगौंड यांच्या शेजारी राहणारे त्याच्याच गावचे सुदिप बसवराज बन्नटे (बसवन्न, ता. बागेवाडी, जि. विजापूर, राज्य कर्नाटक) यांनी विटा पोलिसात येऊन फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी संशयित सिद्धाप्पा शिवगौड यास अटक केली आहे. पुढील पोलीस जे. ए. जाधव अधिक तपास करीत आहेत.