Tuesday, August 26, 2025
Homeअध्यात्मश्री राम जय राम जय जय राम : आज रामनवमीचा धार्मिक सोहळा

श्री राम जय राम जय जय राम : आज रामनवमीचा धार्मिक सोहळा

गुढीपाडव्याला मराठी नववर्षाची सुरूवात होते. या नववर्षातील पहिला धार्मिक उत्सव व सण म्हणून श्रीराम नवमीला विशेष अध्यात्मिक महत्व आहे. रामनवमीला हिंदू धर्म परंपरेत व इतिहासात मोठे स्थान आहे. ‘श्रीराम ‘जय राम जय जय राम’ असा नामजप करीत अनेक भक्त राम नवमीला प्रभू रामचंद्रांची आराधना करतात. आज राम नवमीचा सोहळा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मराठी वर्षातील पहिला महिना असणाऱ्या चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवसाला चैत्र शुध्द नवमी असेही म्हटले जाते. या दिवशी पुष्य नक्षत्रावर, माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असताना अयोध्येत रामचंद्रांचा जन्म झाला. श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ रामनवमी साजरी करतात.. श्रीराम हे अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र होते.

पृथ्वीवर पाप वाढले, दृष्ट शक्ती लोकांना त्रास देऊ लागल्या की श्रीविष्णू अवतार घेतात, असे मानले जाते. अशावेळी भगवान विष्णुने घेतलेला सातवा अवतार म्हणजे श्रीराम होय. लंकेचा राजा रावण याने श्री शंकराकडून वर मिळवला आणि त्यामुळे गर्विष्ठ होऊन सर्वांना त्रास देऊ लागला. अशा या रावणाचा घात करण्यासाठी खुद भगवान विष्णू श्रीरामाच्या रुपात अवतरले. श्रीराम हे आदर्श पुरुष होते. त्यांना ‘मर्यादापुरुषोत्तम’ असेही म्हणतात. एकनिष्ठ, एकवचनी, एकपत्नी हे रामाचे गुण सर्वश्रुत आहेत. त्याचबरोबर राम मातृ-पितृ भक्त होते. बंधुप्रेम, सत्यवचनी, प्रजाप्रेम हे अतिशय श्रेष्ठ गुणही त्यांच्या अंगी होते. श्रीरामाने आईवडिलांच्या आज्ञांचे सदैव पालन केले. आदर्श अशा बंधुप्रेमाला अजूनही राम- लक्ष्मणाचीच उपमा देतात. त्यांच्या राज्यात प्रजा अतिशय सुखी आणि समाधानी होती. म्हणूनच आदर्श राज्याला ‘रामराज्य’ असे म्हटले जाते.

आज देशाच्या विविध भागात रामनवमीचा सोहळा अनेक ठिकाणी साजरा होत आहे. ठिकठिकणच्या राम मंदिरात ‘राम जन्मला गं सखे राम जन्मला’ अशा गीत सेवेतून श्रीरामांचा गोडवा गायला जात आहे. राम जन्मला गं सखे… या गीत रामायणातील अजरामर शब्दांनी हिंदू धर्मामध्ये रामायणाचे आणि रामनवमीचे महत्व अधोरेखीत केले आहे. अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमातून मांगल्याच्या वातावरणात रामनमवी साजरी केली जाते. अयोध्या, सीतामढी अशा उत्तर भारतातल्या शहरांपासून ते दक्षिणेस रामेश्वरमपर्यंत श्रीरामाच्या मंदिरांमध्ये रामजन्मसोहळा साजरा होतो. अनेकजण मंदिरात रामाची पूजा करतात.

अनेकजण घरातही रामाची पूजा करतात. यावेळी
देशात अनेक ठिकाणी रामाची पूजा केली जाते. रामकथा परंपरेने भारताच्या जवळपास सर्वच भाषांमध्ये आहेत. रामनवमीच्या निमित्ताने या रामकथेचे पठण केले जाते. तसेच भजन किर्तन असेही कार्यक्रम आयोजित केले जातात. देवता अन् अवतार यांच्या जन्मतिथीला त्यांचे तत्त्व भूतलावर जास्त प्रमाणात कार्यरत असते. रामनवमी या दिवशी श्रीरामतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते, असे धर्म व अध्यात्मशास्त्रात सांगितले जाते.

रामनवमीला ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप अधिक महत्वाचा आहे. श्रीरामाचे मनोभावे आराधना करण्यासाठी हा नामजप म्हणजे एक मोठा मंत्र आहे. रामनवमीला सर्वांनीच भक्तीभावाने प्रभू रामचंद्रांची आराधना, साधना केली पाहिजे. आज अविचारी प्रकार वाढत आहे. असे दूषित वातावरण विधायक विचाराने निकोप व शुध्द करण्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या विचार व कार्यशैलीचे आचरण केले पाहिजे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -