सांगली जिल्ह्यात भर रस्त्यात पाठलाग करून सराईत गुन्हेगाराची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. अमर उर्फ गुट्ट्या जाधव असे मृत गुन्हेगाराचे नाव आहे. कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी अनेक पथके तयार केली असून, पुढील तपास करत आहेत.
अमर जाधव हा रविवारी (ता. १६) रात्री दहाच्या सुमारास दुचाकीवरून कुपवाड जवळ असणाऱ्या बामनोली येथील आपल्या घरी निघाला होता. दुचाकीवरून हल्लेखारांनी पाठलाग केला. त्याला रस्त्यावर अडवून काही कळायच्या आतच त्याच्यावर धारदार शस्त्रांनी एकामागून एक सपासप वार केले. यामध्ये अमर जाधव गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि रक्तस्त्रावर झाला. तो जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच, घटनास्थळाचा पंचनामा केला.
पोलिसांनी हल्लेखोराच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत. मृत अमर जाधव उर्फ गुट्ट्या विरोधात कुपवाड पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे गुन्हेगारीतून किंवा पूर्ववैमनस्यातून अमर जाधवची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान, सांगली शहरामध्ये गेल्या आठ दिवसांत तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत.