करवीर तालुक्यातील नागदेववाडी येथील बंद बंगला फोडून चोरट्यांनी साडे तीन लाख रुपये सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. सुलोचना किरण कांबळे (वय ६० रा. अमृत पार्क, नागदेववाडी) यांनी बुधवारी सकाळी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सुलोचना कांबळे शासकीय नोकरीतून सेवानिवृत्त झाल्या असून त्या नागदेववाडीत एकट्याच राहतात. १० एप्रिल रोजी त्या यळगूडला आईकडे गेल्या होत्या. दरम्यान १२ एप्रिल रोजी त्यांच्या आईचे निधन झाले. त्यामुळे त्या तिथेच राहिल्या होत्या. बुधवारी सकाळी नागदेववाडीत त्यांच्या शेजाऱ्यांना कांबळे यांच्या घराचा दरवाजा तोडल्याचे दिसून
आले.
शेजाऱ्यांनी कांबळे यांच्या मुंबईतील सूनेला फोनवरुन माहिती दिली. यानंतर सूनेने सुलोचना कांबळे यांना माहिती दिली. बुधवारी सकाळी त्यांनी घरात येऊन पाहिले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी करवीर पोलीसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.
चोरट्यांनी रोख २५ हजार रुपयांसह तीन तोळ्याचा लक्ष्मीहार, अडीच तोळ्याचा राणीहार, अंगठ्या, असे ३ लाख २५ हजाराचे दागिने एकूण साडे तीन लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. याप्रमाणे करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक निवास पवार तपास करत आहेत.








