सांगली जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने मिरज तालुक्यातील जानराववाडीमध्ये छापेमारी करत मोठी कारवाई केली आहे. सुहास अंकुश कुंडले यांच्या राहत्या घराची तपासणी करून दुधामध्ये भेसळीसाठी वापरले जाणारे रिफाईन्ड पामोलिन ऑईल व व्हे पावडरचा साठा जप्त करून ताब्यात घेत मिक्स दुधाचा साठा नष्ट केला. अन्न प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी ही माहिती दिली.
या कारवाईत 5 हजार 877 रूपये किंमतीचे 38 किलो रिफाईन्ड पामोलिन ऑईल, 23 हजार 944 रूपये किंमतीची 146 किलो व्हे पावडर व 320 रूपये किंमतीचा 8 लिटर मिक्स दुधाचा साठा आढळला. दुध व्यवसायिकाकडून सर्व अन्न पदार्थ व भेसळकारी पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेवून उर्वरीत साठा जप्त करण्यात आला. सदर ठिकाणी बाजूच्या प्रद्युम्न खोत यांच्या घरामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सुगंधित तंबाखू 200 ग्रॅमचे 507 बॉक्स (किंमत 41 हजार 320 रूपये) साठा आढळल्याने सदरचा साठा जप्त करून ताब्यात घेण्यात आला. खोतविरोधात मिरज ग्रामिण पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. मसारे यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती फावडे, श्रीमती हिरेमठ, स्वामी व नमुना सहायक कवळे यांच्या पथकाने केली. नागरिकांना अन्न भेसळीबाबत कोणतीही माहिती असल्यास त्यांनी अन्न औषध प्रशासन सांगली कार्यालयाशी 0233-2602202 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा राज्यस्तरीय टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क करून माहिती द्यावी, असे आवाहन मसारे यांनी केले आहे.