कोल्हापूर शहरातील घरफोड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी (ता. २६) रात्री एनसीसी भवन परिसरातील इंगळेनगरात पाच ठिकाणी घरफोडीचे प्रकार घडले. एका घरातून सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. तर चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाले. सचिन दत्तात्रय मोदी यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे. एकाच रात्रीच एकाच ठिकाणी पाच चोरीचे प्रकार घडल्याने राजारामपुरी पोलिसांच्या गस्तीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित आहे.
समजलेली माहिती अशी, फिर्यादी हे २५ एप्रिल रोजी मुलीच्या पदवीदान कार्यक्रमासाठी घराला कुलूप लावून कर्नाटक राज्यात गेले होते. दरम्यान च्या काळात अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील रोख रक्कम, चांदीचे निरंजन, सोन्याचे दोन टोप्स, तसेच कानातील रिंगा असा सुमारे ४५ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. त्याच परिसरात राहणाऱ्या डॉ. रोहित रणजीत रानडे, सचिन अशोक जाधव, प्रभाकर केशव वर्तक, रोहित राजेंद्र धनवडे यांच्या घरात हि चोरट्याने चोरीचा प्रयत्न केले. मात्र त्यांच्या हातास काही लागले नाही. याबाबत सचिन मोदी यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.