गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोल्हापूर-सांगली महामार्गाच्या कामासाठी आता नवीन ठेकेदार नेमण्यात आला आहे. या महामार्गाचे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. याबाबतची माहिती भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.शिरोली पुलापासून ते सांगलीमधील अंकली या 34 किमी रस्त्याच्या चौपदरीकरणाचा खर्च 840 कोटींचा आहे. नितीन गडकरी गुरुवारी कर्नाटकातून कोल्हापुरात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात असलेले खासदार धनंजय महाडिकही होते. यावेळी उभय नेत्यांनी कोल्हापुरातील रस्ते आणि विमानतळासंदर्भात चर्चा केली.
गेल्या अनेक वर्षांपासून बीओटी तत्त्वावर काम करणाऱ्या सांगली-कोल्हापूर रस्त्याचे ठेकेदार न्यायालयात गेल्याने रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट आहे. वाढत्या रहदारीमुळे अपघातांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे हा मार्ग जीवघेणा झाला आहे. हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या रस्त्यासाठी आता नवा ठेकेदार नेमण्यात येऊन हे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिले. दरम्यान, कोल्हापूर विमानतळ मार्गाच्या चौपदरीकरणासाठी खासदार धनंजय महाडिक आग्रही आहेत. यासंदर्भात त्यांनी गडकरींशी चर्चा केली.
जानेवारी महिन्यात कोल्हापूर दौऱ्यामध्ये गडकरी यांनी कोल्हापूर सांगली महामार्गाचे काँक्रिटीकरण लवकरच करणार असल्याची घोषणा केली होती. या रस्त्यावर पुढील 50 वर्षे एकही खड्डा पडणार नाही.कोल्हापूर, सांगलीसह देशभरातील कृषी मालाच्या निर्यातीसाठी हातकणंगले येथे ड्राय पोर्ट उभारू, अशी ग्वाही दिली होती. रेल्वे सुविधा उपलब्ध करून देऊ. त्यासाठी राज्य शासनाने जमीन उपलब्ध करून द्यावी. येथून जगभरात कृषी मालाची निर्यात करता येईल. राष्ट्रीय महामार्गांतर्गत असणाऱ्या रस्त्यांच्या विकासासाठीही निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासनही गडकरी यांनी दिले होते. रत्नागिरी मार्गावरील ‘आंबा ते पैजारवाडी आणि पैजारवाडी ते चोकाक’ या पॅकेजचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले होते.