नवीन महिन्याच्या, म्हणजे जुलैच्या पहिल्या दिवशी आर्थिक बाबतीत अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. या बदलांचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. एलपीजी सिलिंडर, सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. गॅसच्या किंमतींमध्ये वाढ होते की दिलासा मिळतो याकडं सर्वसामान्यांचं लक्ष लागलं आहे.
स्वयंपाकाच्या किंवा व्यावसायिक वापरल्या जाणार्या सिलिंडरच्या किमतींबाबत निर्णय १ जुलै रोजी होणार आहे. सरकारी तेल कंपन्यांकडून दर महिन्याला एलपीजीच्या किमतींचा आढावा घेतला जातो आणि बाजारातील चढउतारांनुसार त्यात बदल केला जातो. मे आणि एप्रिल महिन्यात १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत घट झाली होती. मात्र, १४ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नव्हता. त्यामुळं यावेळी एलपीजीच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे.
सीएनजी आणि पीएनजीचं काय होणार?
मागील महिन्यांप्रमाणेच जुलै महिन्यातही सीएनजी आणि पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस) च्या किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. दिल्ली आणि मुंबईतील पेट्रोलियम कंपन्या त्याच्या किंमतींचा आढावा घेऊ शकतात आणि त्यात चढउतार करण्याचा निर्णय घेऊ शकतात.