शेतातील घराकडे जाण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने नैराश्यातून पती-पत्नीने फेसबुक लाईव्ह करत सोमवार तारीख ३१ रोजी दुपारी राहत्या घरी आत्महत्याचा प्रयत्न केला. प्रशांत प्रल्हाद कांबळे आणि स्वाती प्रशांत कांबळे असे या पती पत्नीचे नाव असून त्यांच्यावर विटा येथील ओम श्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रशांत कांबळे यांच्या शेतातील घराकडे जाणाऱ्या रस्त्याचा कौटुंबिक वाद आहे. याबाबत तहसीलदार यांचे कोर्टात रस्त्याबाबतची केस सुरू आहे. हा रस्ता मिळावा म्हणून प्रशांत कांबळे यांनी कुटुंबासह उपोषण देखील केले होते. मात्र रस्ता खुला झाला नाही. नुकताच या केसचा निकाल लागला असून प्रशांत कांबळे यांची मागणी असंविधानिक असल्याचे निकालात म्हटले आहे. तर प्रशांत कांबळे यांनी या निकालापूर्वी दोन महिने अगोदर आपल्या बाजूनेच रस्ता खुले करण्याचा निकाल झाल्याचा तहसीलदारांचा आदेश फेसबुक वरून टाकला आहे.
सोमवारी दुपारी प्रशांत कांबळे आणि स्वाती कांबळे यांनी फेसबुक लाईव्ह करत लोकांशी संवाद साधला. तहसीलदार कार्यालयाकडून आपल्याला न्याय मिळत नाही तसेच रस्ता मिळण्याच्या कामात राजकीय हस्तक्षेप देखील मोठा आहे, असे गंभीर आरोप करत आपण विषारी औषध पिऊन आत्महत्या करत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर दोघा पती-पत्नीनी भातामध्ये औषध मिसळून ते सेवन केले. फेसबुक लाईव्ह द्वारे ही घटना पाहणाऱ्या काही मित्रमंडळींनी त्यांच्या घरी धाव घेतली आणि प्रशांत कांबळे आणि स्वाती कांबळे यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोघांचीही प्रकृती अजून चिंताजनक असल्याचे सांगण्यात
येत आहे.
तहसीलदार कार्यालयातील निकाल हा राजकीय दबावातून चुकीच्या पद्धतीने लागल्याचा गंभीर आरोप प्रशांत कांबळे यांनी केला आहे. तसेच आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी तहसीलदार उदयसिंह गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्ते समीर कदम याच्यासह अन्य लोकांवर देखील गंभीर आरोप केले आहेत.