वरुणराजाने विश्रांती घेतल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट होऊन पाण्याखाली गेलेला जुना पुल रिकामा झाला आहे. या पुलावर मोठ्या प्रमाणात साचलेले केंदाळ व अन्य कचरा याची पैलवान अमृत भोसले व त्यांच्या सहकारी पैलवानांनी महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने दूर करुन पुलाची स्वच्छता केली. त्याचबरोबर नदीतीरावरील वरदविनायक मंदिरातही स्वच्छता मोहिम राबविली. मागील चार दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे.
मागील आठवड्यात पूर्णत: पाण्याखाली गेलेला जुना पुल आता रिकामा झाला आहे. पुराच्या काळात या पुलावर मोठ्या प्रमाणात केंदाळ आणि अन्य घनकचरा अडकून राहिला आहे. याची माहिती मिळाल्यानंतर पै. अमृत भोसले व त्यांच्या सहकारी पैलवानांनी बुधवारी महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. या स्वच्छता मोहिमेत महानगरपालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक संजय भोईटे, स्वच्छता निरीक्षक सुरज माळगे यांनी स्वच्छता करून घेतली. त्याचबरोबर गणपती मंदिर परिसरात देखील स्वच्छता करण्यात आली.