Thursday, February 6, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीला दूधगंगेतून एक थेंबही पाणी मिळणार नाही; राजेंद्र यड्रावकरांचा स्पष्ट इशारा!

इचलकरंजीला दूधगंगेतून एक थेंबही पाणी मिळणार नाही; राजेंद्र यड्रावकरांचा स्पष्ट इशारा!

इचलकरंजी शहरासाठी दूधगंगा नदीतून पाणीपुरवठ्याची सुळकूड पाणी योजना रद्द करावी, यासाठी दत्तवाडसह घोसरवाड, टाकळीवडी नवे दानवाड, जुने दानवाड येथील सर्व व्यवहार बंद करून ग्रामस्थांकडून कडकडीत बंद पाळण्यात आला.

याबरोबरच या पाच गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी दत्तवाड येथील गांधी चौक येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. दूधगंगा बचाव कृती समिती दत्तवाड आयोजित पाच गावचे लोकप्रतिनिधी, कर्नाटकाच्या बोरगाव, मलिकवाड, सदलगा, तसेच सांगाव, सुळकूड, वंदूर, कागल, बिद्री, येथूनही लोक मोठ्यासंख्येनेउपस्थित होते.

शिरोळ तालुक्यातील सगळ्या पक्षाच्या, गटापदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. दरम्यान, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बंदला पाठिंबा देतानाच इचलकरंजी शहरास दूधगंगेतून एक थेंबही मिळणार नाही. त्यांनी दूधगंगेच्या पाण्याचा अट्टाहास सोडावा व पंचगंगा प्रदूषणमुक्त करूनच इचलकरंजीला पाणी द्यावे, असे सांगितले.
दूधगंगा बचाव समितीच्या वतीने सुळकूड योजना तत्काळ रद्द करण्याबाबतचे निवेदन आमदार यड्रावकर यांना देण्यात आले. आमदार यड्रावकर म्हणाले, ‘कृष्णा योजनेची गळती इचलकरंजी रोखू शकत नाही. त्यामागचे अर्थकारण तपासण्याची आवश्यकता आहे.

इचलकरंजीला खरेच पाण्याची गरज आहे का की राजकारणासाठी सुळकूड पाणी योजना आहे हे तेथील राजकर्त्यांनी स्पष्ट करावे. शुद्ध पाणी हा सर्वांचा अधिकार आहे. पण पंचगंगा प्रदूषित करून इचलकरंजीकरांनी शिरोळ तालुक्यातील टाकवडेपासून सर्व गावांना दूषित पाणी दिले आहे याचीही जाणीव ठेवावी. त्यामुळे दूधगंगा योजनेतून इचलकरंजीकरांना एक थेंब पाणी मिळणार नाही.’

यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, भवानीसिंह घोरपडे, भाजयुमोचे प्रदेश सचिव अॅड. सुशांत पाटील यांनीही इचलकरंजीला दूधगंगेतून पाणी देण्यास विरोध असल्याचे सांगितले. यावेळी बाबासाहेब पाटील, अण्णासोा हावले, धनराज घाटगे, बबन चौगुले, बाळासाहेब पाटील अमोल शिवई, मनोज कडोले, सागर कोडेकर, ‘आंदोलन अंकुश’चे धनाजी चुडमुंगे, दीपाली परीट, मिनाज जमादार, बाबासोा वनकोरे, नवे दानवाडचे सरपंच सी. डी. पाटील, नितीन बागे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत सरपंच चंद्रकांत कांबळे यांनी केले. आभार संजय पाटील यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -