Tuesday, April 30, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजीत घरगुती गौरी गणपतीला निरोप! पंचगंगा नदीघाट गर्दीने फुलला

इचलकरंजीत घरगुती गौरी गणपतीला निरोप! पंचगंगा नदीघाट गर्दीने फुलला


‘गणपती बाप्पा मोरया… ‘पुढच्या वर्षी लवकर या…’ अशा जयघोषात, ढोल- ताशाच्या निनादात अबालवृध्दांच्या अमाप उत्साहाने जड अंत:करणाने वस्त्रनगरीत पाच दिवसाच्या घरगुती गणपती व गौरीचे शनिवारी विसर्जन करण्यात आले. दिवसभर पंचगगा नदीघाट अक्षरश: गर्दीने फुलून गेला होता. घरगुती गणपतीसह सहकारी संस्था, बँका यांनीही शनिवारी श्रींना अखेरचा निरोप दिला. तर महापालिका प्रशासनाच्या वतीने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पंचगंगा नदीघाटावर सकाळपासूनच नागरिकांची रेलचेल होती. तर दुपार नंतर विसर्जनासाठी गर्दी वाढत चालली होती. सायंकाळनंतर संपूर्ण पंचगंगा नदीघाट परिसर अक्षरश: गर्दीने फुलून गेला होता. ही गर्दी रात्री उशिरापर्यंत होती. यामध्ये पावसानेही विश्रांती दिल्याने गणेश विसर्जनाप्रसंगी नागरिकांना दिलासा मिळाला. शहापूर खणीतही नागरिकांनी श्री मूर्ती विसर्जनला मोठा प्रतिसाद दिला.

इचलकरंजी शहर परिसरात गेल्या पाच दिवसापासून भक्तिमय वातावरणात घरोघरी श्रींची स्थापना करण्यात आली होती. शनिवारी पाचव्या दिवशी गणपतीसह गौरीचे विसर्जन करण्यात आले. पंचगंगा नदीघाटासह विविध ठिकाणच्या विहिरीत रात्री उशिरापर्यंत हा विसर्जन सोहळा सुरू होता. सकाळपासूनच घरगुती गणपतीचे पूजन करण्यात येऊन निरोप देण्यात भक्तगण गुंतले होते. पंचगंगा नदीघाटावर बहुतांशी घरगुती गणपतीचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. हजारो घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन पंचगंगा नदीघाटावर गौरी-गणपती विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे संपूर्ण परिसर फुलून गेला होता.

महानगरपालिकेने शहरात चार झोनमध्ये विविध ७२ ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडाची सुविधा उपलब्ध करुन देत मूर्ती दान करण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांतूनही मोठा प्रतिसाद लाभला. आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. महानगरपालिकेतील जवळपास ६५० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या पर्यावरण पुरक विसर्जन व्हावे यासाठी शहापूर खणीचा उपयोग गेल्या काही वर्षापासून गणेश विसर्जनासाठी केला जात आहे. यंदाही शहापूर खणीमध्ये विसर्जनाची सोय करण्यात आली होती. त्याठिकाणी इचलकरंजी शहरासह आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिक आल्याचे दिसून येत होते. रात्री आठ वाजेपर्यंत सुमारे सहाशेहून अधिक गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

पंचगंगा नदीचे वाढते प्रदुषण पाहता नदीघाटावर नागरिकांनी जबाबदारी ओळखून निर्माल्याचे दान केले.
नदी घाटावर विसर्जनसाठी होणारी गर्दी लक्षात घेता शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या बतीने योग्य नियोजन केले होते. त्यामुळे भाविकांची तसेच विसर्जन मार्गावर कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. वाहतूक शाखेचे सपोनि राजीव पाटील हे स्वतः आपल्या सहकार्यांसह परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. घाटावर महानगरपालिकेने दक्षतेचे उपाय म्हणून अग्निशामक दल व आरोग्य विभागाचे पथक तैनात ठेवले होते. तर नदीपात्रात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पंचगंगा जलविहार तरुण मंडळाचे कार्यकर्ते होडी व यांत्रिक बोटीतून लक्ष ठेवून होते.

सकाळी ८ वाजल्यापासून नियोजित सर्वच ठिकाणी विसर्जनाची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत विविध ७२ ठिकाणच्या जलकुंडांमध्ये ५५९६ मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. तर अंदाजे ७ टन निर्माल्य जमा झाले होते. शहापूर खण येथे सायंकाळपर्यंत १८६१ मूर्तीचे विसर्जन करण्यात येऊन २ टन निर्माल्य जमा झाले होते. त्याचबरोबर स्टारनगर विहिरीत १३७ मूर्तीचे विर्सजन होऊन १ टन निर्माल्य जमा करण्यात आले होते.

पंचगंगा व शहापूर खण विसर्जन मार्गावर वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी शहर वाहतूक शाखेच्या बरोबर पोलिस विभागाच्या सहकार्यांनी योग्य नियोजन केले होते. त्यामुळे विसर्जन मार्गामध्ये कोणताही अडथळा आला नसल्याचे दिसून आले.

एकिकडे प्रशासनाने कृत्रिम जलकुंडांची सोय करुन दिली असली तरी अनेक गणेशभक्तांनी पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जन करण्यास नदीतीरावर गर्दी केली होती. नदीत मुर्ती विसर्जनासाठी प्रशासनाकडूनही कोणतीही आडकाठी आणली जात नव्हती. दुपारनंतर मूर्ती विसर्जनासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत होते. कृत्रिम ! जलकुंडांसह शहापूर खण आणि पंचगंगा नदी येथे विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -