येथील कृष्णानगर व महालक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांनी नागरी सुविधांसाठी महानगरपालिकेवर मोर्चा काढला. यावेळी प्रश्नांची सरबती करत प्रशासनाला धारेवर धरले. प्रभागातील प्रश्न तातडीने सोडवा अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडावे लागेल असा इशाराही देण्यात आला.
महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक दोन व प्रभाग क्रमांक तीन कृष्णानगर, महालक्ष्मीनगर परिसरात गटारींची दूरवस्था झाली आहे. तर काही ठिकाणी अद्याप गटारी नसल्यामुळे सांडपाण्याची निर्गत होत नाही. त्यामुळे परिसरात सांडपाणी साचून त्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊन साथीचे आजार पसरत आहेत. त्याबरोबर परिसरात दैनंदिन स्वच्छता व कचरा उठाव होत नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सात दिवसातून एकदा मिळणारे पाणी कमी दाबामुळे अपुरे पडते. याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना वारंवार भेटून निवेदन देऊनही प्रशासन लक्ष देत नसल्याने गुरुवारी भागातील संतप्त नागरिकांनी उपायुक्त तैमुर मुल्लाणी यांची भेट घेत गाऱ्हाणे मांडले. यावेळी मुल्लाणी यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेत कृष्णानगर व महालक्ष्मीनगरमधील नागरी समस्या तातडीने सोडवण्याच्या सूचना केल्या. यावेळी भाजप महिला आघाडी अध्यक्षा पुनम जाधव, अर्चना कुरळे, सुवर्णा हिप्परगी, हौसाबाई शेडगे, सिमरन जमादार, अनुसया टकले, सीता मस्के आदिसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.