यंत्रमाग व्यवसायासह इतर उद्योगातील कामगारांच्या हाती शुक्रवारी बोनस पडला. यामुळे दिवाळी खरेदीसाठी मुख्य रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत रस्ते गर्दीने फुलून गेले होते.
पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने खरेदीला उधाण आले होते. शहर परिसरातील यंत्रमाग व्यवसायातील कामगारांना सुमारे ६० ते ६५ कोटी रुपयांचे वाटप केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यंदा वस्त्रनगरीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वर्षभरातील सर्वात मोठ्या दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. खरेदीसाठी शहरातील म. गांधी पुतळा ते श्री शिवतीर्थपर्यंत मुख्य रस्त्यासह शहरातील विविध चौक तसेच विविध दुकानांमध्ये कपडे, सजावटीचे साहित्य, आकाश कंदील, पूजेचे साहित्य व इतर साहित्य खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. इचलकरंजी शहर वस्त्रनगरी म्हणून प्रसिद्ध आहे.
कामगार वर्गाच्या हातात बोनसची रक्कम मिळाल्याशिवाय
बाजारपेठेत गर्दी दिसून येत नाही. दिवाळीतील महत्त्वाचे लक्ष्मीपूजन रविवारी आहे. तत्पूर्वी म्हणजेच
आज शुक्रवारी शहर परिसरातील यंत्रमाग व्यवसायातील यंत्रमाग कामगार, कांडीवाला, जॉब, दिवाणजी यांच्यासह अन्य व्यवसायातील कामगारांच्या हातीही बोनस मिळाला आहे.
साध्या यंत्रमागावर सुमारे सतरा ते अठरा हजार कामगार वर्ग आहे. त्यांना किमान १७ ते कमाल २५ हजारपर्यंत तर ॲटोलूमवर सुमारे सात ते आठ हजार कामगार असून त्यांना
किमान २० हजारापासून कमाल ४० हजारापर्यंत बोनसची रक्कम मिळाली आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत खरेदीसाठी मुख्य रस्त्यावर गर्दी दिसून येत होती.
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. तसेच गेली दोन दिवस ढगाळ वातावरण असल्याने विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. परंतु शुक्रवारी पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने खरेदीला अक्षरशः उधाण आले होते.





