इचलकरंजी : हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे टेम्पो आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात महाविद्यालयीन तीन विद्यार्थी जखमी झाले. यापैकी अथर्व वैभव बाबर (वय 18, रा. गणेशनगर, इचल.) याचा सांगली सिव्हील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
उर्वरीत जखमींपैकी पृथ्वीराज सुतार याच्यावर सांगली सिव्हील रुग्णालयात आणि अखिलेश बाबर (दोघे रा. गणेशनगर, इचल.) याच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताची माहिती समजताच नातेवाईक आणि मित्रांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.
येथील गणेशनगरमध्ये राहणारे अथर्व बाबर, त्याचा चुलत भाऊ अखिलेश बाबर आणि त्यांचा मित्र पृथ्वीराज सुतार हे 12 वीमध्ये शिक्षण घेतात. आज दुपारी हे तिघे एकाच दुचाकीवरून कोरोचीच्या दिशेनं निघाले होते. ते कोरोची माळावरील निलतारा हॉटेलजवळ पोहचले असता समोरून येणार्या छोटा हत्ती टेम्पोची समोरासमोर धडक झाली.
हा अपघात इतका गंभीर होता की टेम्पोच्या ड्रायव्हर बाजुच्या दोन्ही टायर फुटल्या तर दुचाकीवरील तिघेही सुमारे 30 फुट लांब उडून पडले. अथर्व बाबर आणि पृथ्वीराज सुतार या दोघांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यानं ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
नेहमीच वर्दळीच्या मार्गावरील या अपघातानंतर नागरीकांनी गर्दी केली होती.या गर्दीत टेम्पोचालकानं पलायन केलं. त्यामुळं गंभीर अवस्थेतील जखमी तिघांनाही नागरीकांनी तातडीनं आयजीएम रुग्णालयात दाखल केलं. प्राथमिक उपचारानंतर अथर्व आणि पृथ्वीराज या दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं स्पष्ट झालं.
त्यामुळं दोघांनाही सांगली सिव्हील रुग्णालात हलवलं मात्र उपचारादरम्यान अथर्वचा मृत्यू झाला. या अपघातातील तिसरा जखमी अखिलेश याच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताची माहिती समजताच नातेवाईक आणि जखमींच्या मित्रांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.