आवळे मैदान परिसरात गेल्या आठ दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने परिसरातील संतप्त नागरिकांनी मंगळवारी आवळे मैदान ते थोरात चौक रस्त्यावर ठिय्या मारत आंदोलन केले.
अर्धातास सुरु असलेल्या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अखेर महानगरपालिकेचे शाखा अभियंता बाजी कांबळे यांनी आंदोलकांची समजूत काढत पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शहरातील आवळे मैदान परिसरात आठ दिवसांपासून पाणी न आल्याने नागरिकांना विशेषत: महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. या संदर्भात प्रशासनाकडे तक्रार करुनही पाणी सोडले जात नव्हते. त्यातच मंगळवारी पाणी सोडण्याचे सांगूनही पाणी न आल्याने संतप्त नागरिकांनी आवळे मैदानासमोर घागरींसह रस्त्यावर ठिय्या मारत रस्ता रोखून धरला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर शाखा अभियंता बाजी कांबळे यांनी आंदोलनस्थळी येत मंगळवारी दिवसभर वीज पुरवठा खंडती झाल्यामुळे पाणी सोडता आले नाही असे सांगत बुधवारी पाणी देऊ असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले.
या आंदोलनात माजी नगरसेवक अब्राहम आवळे, पिंटू आवळे, अरीफ आत्तार, वीजूबाई जमदाडे, बाळाबाई कांबळे, सुनिता कांबळे, वैशाली हेगडे, संगिता निंबाळकर आदींसह नागरिक सहभागी झाले होते.