Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंगलाडका भाऊ योजनेत मोठा ट्विस्ट, योजना 50 वर्षापूर्वीची?; अंबादास दानवे यांचा दावा...

लाडका भाऊ योजनेत मोठा ट्विस्ट, योजना 50 वर्षापूर्वीची?; अंबादास दानवे यांचा दावा काय?

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेनंतर लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांसाठीची ही योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरून देण्यास सांगण्यात आलं आहे. पण आता या योजनेवरच राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला आहे. ही योजना अत्यंत जुनी असून सरकार फसवणूक करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

 

लाडकी बहीण योजनेला महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यानंतर राज्य सरकारने लाडका भाऊ योजना आणली आहे. बेरोजगारांसाठीची ही योजना आहे. त्यामुळे या योजनेलाही मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र, या योजनेवरून आता वाद निर्माण झालेला पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या योजनेवर टीका केली आहे. ही नवी योजना नाहीच. ही जुनीच योजना आहे. 50 वर्षांपूर्वीची ही योजना असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना दानवे यांनी हा दावा केला आहे.

 

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना म्हणजे निव्वळ तरुणांची फसवणूक आहे. ही योजना राज्यात 1974 पासून सुरू आहे. या योजनेत आधीपासून मानधन दिले जाते. यात नवीन काही नाही. थोडक्यात जनतेची आणि तरुणांची ही फसवणूक आहे. ही सर्व जुनी योजना आहे आणि ही जुनी योजना मुख्यमंत्र्यांच्या नव्या नावाने समोर आणली आहे, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. या योजनेला फसू नका. निवडणुकीच्या तोंडावर सरकारला हे सर्व आठवत आहे. लाडका भाऊ आणि लाडकी बहीण या योजना प्रत्यक्षात जुन्या योजना आहेत. आताच्या घडीला इंडस्ट्रीत रोजगार उपलब्ध आहेत. सरकार नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर खासगीकरण करत आहे. एकीकडे तरुणांना अशाप्रकारे भूल थापा देत आहे, असा दावाही दानवे यांनी केला.

 

फसवी घोषणा

 

आधीच सुरू असलेल्या योजनेचे नाव बदलून मुख्यमंत्र्याच्या नावाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी युवकांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने केलेला हा खटाटोप आहे. प्रत्यक्षात रोजगार निर्मितीसाठी यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी अनेक योजना आणि रोजगार मिळावे घेतले. परंतु वास्तविकरित्या या योजनांमधून तरुणांना काहीही मिळाले नसून निवडणुकीपूर्वीची फक्त ही फसवी घोषणा असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

 

जनता दरबार घेऊन दाखवाच

 

दरम्यान, अंबादास दानवे यांचा संभाजीनगरातील पैठणमध्ये शिवसंपर्क अभियान दौरा सुरू झाला आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे यांच्यावर जोरदार टीका केली. संदीपान भुमरे किंवा त्यांच्या मुलाला इथं जनता दरबार घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी जनता दरबार घेतला तर व्हिडिओ काढून पाठवा. त्यांना मी बघतो. आता पैठणच्या आमदाराने राजीनामा दिलेला आहे. ते पैठणचे खासदार नाहीत. तर इथे कल्याण काळे लोकसभेचे प्रतिनिधी आहेत. राजीनामा दिलेले आमदार आणि त्यांच्या मुलाला जनता दरबार घेण्याचा अधिकार नाही. घेतलाच तर मला व्हिडियो काढून पाठवा. मी बरोबर करतो. यांना घाबरण्याची अजिबात गरज नाही, असा इशाराच दानवे यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -