रिलायन्स इंडस्ट्रीची काल एजीएम मिटिंग पार पडली. यावेळी रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी रिलायन्समधील नोकरकपातीच्या बातम्या निराधार असल्याचं सांगितलं. तसेच रिलायन्समध्ये गेल्या आर्थिक वर्षात प्रत्येत तासाला 20 लोकांना नोकरी देण्यात आली असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली आहे. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 6.5 लाख झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी आपल्या कंपनीत होत असलेल्या नोकरकपातीच्या बातम्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचं म्हटलं आहे. गेल्या आर्थिक वर्षात 1.7 लाख लोकांना आपण रोजगार दिले आहेत. याशिवाय कंपनीत कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 6.5 लाखाहून अधिक झाली आहे. विशेष म्हणजे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीच्या वार्षिक अहवालात कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात झाल्याचं म्हटलं होतं. त्यावरही मुकेश अंबानी उत्तर दिलं आहे. कर्मचारी संख्या घटण्याचं कारण म्हणजे कर्मचाऱ्यांनी नोकरीचे वेगवेगळे मॉडेल निवडले होते. आम्ही कुणालाही कामावरून कमी केलं नव्हतं, असं अंबानी यांनी म्हटलं आहे.
नोकरसंख्या का कमी होतेय?
रोजगार सृजनची परिस्थिती जागतिक स्तरावर बदलत आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे तंत्रज्ञानाचा वाढता वापर आहे. तसेच लवचिक व्यापारी धोरणं आहेत. त्यामुळे रिलायन्स केवळ पारंपारिक प्रत्यक्ष रोजगार मॉडेल ऐवजी नवीन प्रोत्साहनावर आधारीत मॉडेल स्वीकारत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना घसघशीत कमाई करण्यास मदत मिळते. त्यांच्या उद्ममशील भावना तयार होते. त्यामुळेच प्रत्यक्ष रोजगाराच्या वार्षिक आकड्यांमध्ये थोडी घसरण झाली आहे. मात्र, रिलायन्सने निर्माण केलेल्या रोजगारात वाढ झाली आहे. अंबानी यांनी भारतातील युवांसाठी रोजगार सृजनाला सर्वोच्च राष्ट्रीय प्राथमिकतेचा दर्जा दिला आहे. अनेक एजन्सीने रिलायन्सला भारतातील सर्वश्रेष्ठ नोकरी देणारी कंपनी म्हणून स्थान दिलं आहे. रिलायन्स भारतातील सर्वात मोठ्या जॉब देणाऱ्या कंपनींपैकी एक आहे.
जगातील 30 वी सर्वात मोठी कंपनी
भूतकाळाच्या तुलनेत आपलं भविष्य अधिक पटीने उज्ज्वल आहे. रिलयान्सला ग्लोबल लेव्हलला टॉप 500 कंपन्यांमध्ये सामील होण्यासाठी दोन दशकाचा काळ लागला. येत्या दोन दशकात आपण जगातील टॉप 50 मौल्यवान कंपन्यांमध्ये सामील झाली आहे. आपल्या राजकीय संस्कृतीसोबत डीप टेक आणि अॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगसह आपण रिलायन्सला जगातील 30 बड्या कंपन्यांमध्ये सामील करणार आहोत, असं मुकेश अंबानी यांनी म्हटलंय.