सोमवारी रात्री मृत्यू होऊनही मृतदेह दफन करण्यासाठी जागाच नसल्याने नातेवाइकांनी मृतदेह चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आणला. दफनभूमीबाबत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत जाणार नाही, असा पवित्रा घेतल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली.
मृतदेह दफन करू की दहन, असा उद्विग्न सवाल मृताच्या भावाने केला. पोलिसांनी समजूत काढून मृतदेह परत घेऊन जाण्यास भाग पाडले.
कनाननगर परिसरात वंदना राजेश वाघमारे यांचा सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. मात्र, ख्रिश्चन दफनभूमीत जागा उपलब्ध नसल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करता आले नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी वाघमारे यांचा मृतदेह टेम्पोत घालून थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आणला.
या प्रकाराने प्रशासनाची तारांबळ उडाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात असलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचार्यांनी टेम्पो थांबवला. यावेळी नातेवाइकांनी वस्तुस्थिती सांगत महापालिका अधिकारी ख्रिस्ती दफनभूमीच्या जागेविषयी ठोस आश्वासन देत नाहीत तोवर मृतदेह घेऊन परत जाणार नाही, असा पवित्रा घेतला.
बराच वेळ या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी फिरकलेच नाहीत, त्यामुळे नातेवाईक अधिक आक्रमक झाले. दरम्यान, शाहूपुरी पोलिसांनी नातेवाइकांची समजूत काढली. प्रशासनासोबत चर्चा करून दफनभूमीचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक मृतदेह घेऊन परत गेले. शहरात ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न ऐरणीवर आहे. याबाबत ठोस निर्णय होत नाही. आता हा मृतदेह जाळू की दफन करू, असा संतप्त सवाल मृताचा भाऊ विवेक भालेराव यांनी केला.