अभिनेता सलमान खानला मारण्यासाठी बिश्नोई गँगने 25 लाख रुपयांची सुपारी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सलमान खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून त्याला आता वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. नवी मुंबई प्रकरणात सलमान खानला मारण्यासाठी बिष्णोई टोळीने 25 लाख रुपयांची सुपारी घेतली होती.
सलमान खानचा गेम करण्यासाठी बिश्नोई गँगचं तगडं प्लॅनिंग
सलमान खानच्या हत्येचा बिश्नोई गँगचा प्रयत्न होता. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. सलमान खानच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी तपास करत असलेल्या नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीतील पाच आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. आता सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिश्नोई गँगने सलमान खानला मारण्यासाठी 25 लाख रुपयांची सुपारी दिल्याचं पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलं आहे.
25 लाखांची सुपारी, 60 ते 70 जण तैनात
सलमान खानला मारण्यासाठी आरोपींनी पाकिस्तानातून AK 47, AK 92 आणि M 16 ही आधुनिक शस्त्रे विकत घेण्याची योजना आखली होती. याशिवाय ज्या बंदुकीने पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची हत्या करण्यात आली होती, त्या तुर्कीने बनावटीच्या जिगना हत्यारने आरोपी सलमान खानला मारण्याच्या प्रयत्नात होते. आरोपी सलमान खानच्या हालचालींवर पाळत ठेवून होते, यासाठी अनेक जण तैनात करण्यात आले होते.
सलमान खानच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष
ऑगस्ट 2023 ते एप्रिल 2024 दरम्यान सलमान खानच्या हत्येची योजना आखण्यात आली होती, असं पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलं आहे. पोलिसांनी सांगितलं की, जवळपास 60 ते 70 लोक सलमान खानच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते, ही धक्कादायक बाब समोर आली आहे. हे सर्वजण सलमान खानच्या मुंबईतील घर, पनवेलच्या फार्म हाऊस आणि गोरेगावमधील त्याच्या प्रत्येक हालचालीची बातमी पोहोचवत होते.