ताजी बातमी ऑनलाईन टीम
इचलकरंजीचे उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या वाहनाला ट्रॅक्टरने धडक दिल्याची घटना नुकताच शहरात घडली. यामध्ये त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. ही घटना शहरातील स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आबेडकर पुतळा परिसरात घडली.
या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वाहतूक नियंत्रण शाखा व शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.
इचलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर हे मंगळवारी दुपारच्या सुमारास वाहनातून महानगरपालिकेत चालले होते. यावेळी त्यांच्या सोबत चालक आणि गार्डही होता. त्यांची गाडी स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक आली असताना पाठीमागून येत असलेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने चुकीच्या पध्दतीने वळण घेतल्याने ट्रॅक्टरची थेट उपायुक्तांच्या वाहनाला धडक बसली.
यावेळी ट्रॅक्टरचे पुढचे गार्ड उपायुक्तांच्या वाहन चालकाजवळ घुसले आणि दरवाजाच्या काचा फुटल्या, वर्दळीच्या मार्गावर मुख्य चौकातच झालेल्या या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. परंतु सुदैवाने कोणालाही हानी पोहोचली नाही.