केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या 2025 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात नागरिकांना दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. सरकारने सोन्या-चांदीच्या दागिन्यांवरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे या मौल्यवान धातूंच्या किंमतींमध्ये घट होणार आहे.
यासह, प्लॅटिनमवरील आयात शुल्कातही मोठी कपात करण्यात आली आहे.
काय बदल झाले ?
सोने आणि चांदीवरील आयात शुल्क २५% वरून २०% करण्यात आले आहे.
प्लॅटिनमवरील सीमाशुल्क २५% वरून थेट ५% पर्यंत कमी करण्यात आले आहे.
हे बदल २ फेब्रुवारी २०२५ पासून लागू झाले आहेत.
या घोषणेमुळे होणारे परिणाम:
१) आयात केलेले दागिने स्वस्त
सरकारच्या या निर्णयामुळे इटली, फ्रान्स, स्वित्झर्लंड आणि इतर पाश्चात्य देशांतून आयात होणाऱ्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या किंमतीमध्ये घट होईल. यामध्ये प्रख्यात ब्रँड्स जसे की टिफनी, बल्गारी, कार्टियर यांचे दागिने भारतीय बाजारपेठेत अधिक स्वस्त मिळतील, अशी माहिती ज्वेलर्सनी दिली आहे.
२) ब्रँडेड दागिन्यांची मागणी वाढणार
सोन्या-चांदीचे दागिने स्वस्त झाल्याने भारतीय बाजारपेठेत ब्रँडेड दागिन्यांची मागणी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. मुंबईतील कामा ज्वेलरीचे व्यवस्थापकीय संचालक कॉलिन शाह यांनी सांगितले की, “ही घोषणा लक्झरी दागिन्यांच्या विक्रीस चालना देईल आणि भारतीय ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध करून देईल.”
३) स्वतंत्र एचएस कोड
सरकारने प्लॅटिनम आणि सोन्याच्या मिश्रधातूंना स्वतंत्र हार्मोनाइज्ड सिस्टम (एचएस) कोड प्रदान करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यामुळे आयात प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि या धातूंच्या व्यापारास चालना मिळेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
४) सोन्याच्या आयातीत विक्रमी वाढ
सरकारच्या आकडेवारीनुसार एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत सोन्याच्या दागिन्यांची आयात ८७.४% नी वाढली. यात प्रामुख्याने चेन, झुमके, अंगठ्या यांचा समावेश आहे. नव्या आयात शुल्क कपातीमुळे ही वाढ आणखी वेग घेण्याची शक्यता आहे.
बाजारपेठेवरील प्रभाव
या घोषणेमुळे:
सोन्या-चांदीच्या वस्त्राभूषणांच्या किमती स्वस्त होतील.
ब्रँडेड ज्वेलरी उद्योगाला चालना मिळेल.
प्लॅटिनम आणि मिश्रधातूंच्या वापरात वाढ होईल.
ज्वेलरी आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी हा निर्णय लाभदायक ठरेल.
अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये चढ-उतार झाले. सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर ८३,३६० रुपयांवर पोहोचला, तर चांदीच्या दरात प्रतिकिलो १,१५० रुपयांची वाढ झाली, त्यामुळे चांदीची किंमत ९४,१५० रुपये प्रतिकिलो झाली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मधील ही घोषणा सोन्या-चांदीच्या व्यापारासाठी आणि ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. आयात शुल्क कपात झाल्याने ग्राहकांना अधिक परवडणाऱ्या दरात ब्रँडेड दागिने खरेदी करण्याची संधी मिळणार असून, लक्झरी ज्वेलरी मार्केटमध्येही मोठी वाढ अपेक्षित आहे. आता पाहावे लागेल की भारतीय ग्राहक या बदलांना कसा प्रतिसाद देतात.