Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्रएआयडीएस, एआयएमएलची क्रेझ; आयटी क्षेत्रात AI संबंधित विद्यार्थ्यांना वाढती मागणी

एआयडीएस, एआयएमएलची क्रेझ; आयटी क्षेत्रात AI संबंधित विद्यार्थ्यांना वाढती मागणी

संगणक क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झपाट्याने वाढत आहे. यातूनच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्स (एआयडीएस) तसेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंग (एआयएमएल) या अभियांत्रिकीच्या दोन नव्या शाखा उदयास आल्या असून, या दोन्ही शाखांची विद्यार्थ्यांमध्ये क्रेझ वाढत आहे.

 

आयटी क्षेत्रात देखील कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित विद्यार्थ्यांना मोठी मागणी वाढत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

 

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, एआयडीएस ही शाखा डेटा सायन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एकत्रित अभ्यासावर केंद्रित आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर डेटा कसा हाताळायचा, त्यावर प्रक्रिया कशी करायची आणि त्या डेटामधून उपयोगी माहिती कशी मिळवायची, यावर भर दिला जातो. यामध्ये डेटा विश्लेषण, सांख्यिकी, मोठ्या प्रमाणावरील डेटाचे व्यवस्थापन आणि त्याचा अर्थ लावण्यासाठी साधने आणि अल्गोरिदम शिकवले जातात.

 

एआयएमएल ही शाखा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंगवर केंद्रित आहे. या शाखेतील विद्यार्थ्यांना संगणकांना स्वयंचलितपणे शिकवण्याचे आणि निर्णय घेण्याचे तंत्रज्ञान शिकवले जाते. मशिन लर्निंग हे ‘एआय’चा महत्त्वाचा भाग असून, यामध्ये संगणकांना स्वतःहून विश्लेषण करणे आणि भविष्यवाणी करणे शिकवले जाते.

 

या शाखेतील विद्यार्थ्यांना मशिन लर्निंग अल्गोरिदम्स, डीप लर्निंग आणि न्यूरल नेटवर्क्स, संगणकाची दूरद़ृष्टी, स्वायत्त प्रणाली आणि रोबोटिक्स, एआयचे नैतिक आणि कायदेशीर पैलू तसेच भाषा आणि प्रतिमा ओळख प्रणाली यांची माहिती देण्यात येते.

 

दोन्ही शाखांमध्ये उत्तम करिअर संधी

 

एआयडीएस आणि एआयएमएल या दोन्ही शाखा ‘एआय’च्या संकल्पनांवर आधारित असल्या, तरी त्यांचा उपयोग वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये होतो. आरोग्य, वित्त, ई-कॉमर्स, शिक्षण आणि अगदी शेतीमध्येही या दोन्ही शाखांचे महत्त्व वाढत आहे. मोठ्या प्रमाणावर डेटावर आधारित निर्णय प्रणाली आणि स्वयंचलित प्रणालींना प्राधान्य असल्यामुळे या दोन्ही शाखांमध्ये उत्तम करिअर संधी उपलब्ध आहेत.

 

– प्रा. पराग जांभुळकर, एआयतज्ज्ञएआयडीएस आणि एआयएमएल या दोन्ही शाखा भविष्यातील तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी राहणार आहेत. एआयडीएस विद्यार्थ्यांना डेटा विश्लेषण व धोरणात्मक निर्णयक्षमतेचा अभ्यास शिकवते, तर एआयएमएल विद्यार्थ्यांना संगणकांना ‘शिकवण्याच्या’ तंत्रज्ञानावर भर देण्याची संधी देते. भविष्यात ‘एआय’ आधारित ऑटोमेशन आणि स्मार्ट डेटा अ‍ॅनालिटिक्स या दोन्ही गोष्टी प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाच्या ठरणार आहेत. – प्रा. योगेश हांडगे, सहायक प्राध्यापक संगणक विभाग, पुणे इन्स्टि. ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीएआयडीएस आणि एआयएमएल या दोन्ही शाखा भविष्यातील उच्च तंत्रज्ञानावर आधारित आहेत आणि त्या जगभरातील विविध उद्योगांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. विद्यार्थ्यांनी या शाखांमधील संधी ओळखून योग्य दिशा निवडल्यास त्यांना जागतिक स्तरावर मोठे यश मिळू शकते. एआय आणि डेटा सायन्समधील प्रगतीमुळे स्वयंचलित निर्णय प्रणाली, स्मार्ट तंत्रज्ञान आणि डेटा विश्लेषणाच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -