नाशिक शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले आहे. पाथर्डी फाटा (Pathardi Phata) परिसरात असलेल्या फाळके स्मारकजवळील (Phalke Smarak) एका हॉटेलमध्ये मद्यपींच्या चार ते पाच जणांच्या टोळक्याकडून दोन भावांना मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. यात राम बोराडे (20) याचा मृत्यू झाला आहे तर राजेश बोराडे हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये बसलेल्या चार ते पाच मद्यपींकडून रागाने का बघतो म्हणून वाद घालण्यात आला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. टोळक्याने कोयत्याने वार करून राम बोराडे आणि त्याचा चुलत भाऊ राजेश बोराडे या दोघांवर सपासप वार करण्यात आले.
वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न
या हल्ल्यामध्ये राम बोराडे याचा जागीच मृत्यू झाला असून राजेश बोराडे हा गंभीर जखमी झाला आहेत. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर टोळक्याने परिसरातील चारचाकी वाहनांची देखील तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
टोळक्याकडून रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने वार
दरम्यान, नाशिकच्या श्रमिकनगर परिसरातील कडेपठार येथे दोन जणांच्या वादात झालेल्या मारहाणीत रिक्षाचालक इसमाचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. प्रकाश मधुकर सूर्यवंशी (39) असे मृत झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून मृत प्रकाश सूर्यवंशी हे स्वामी नरेंद छाया हाइट्स कडेपठार सोसायटीत कुटुंबासोबत राहत होते. गुरुवारी रात्री त्याच सोसायटीत राहणारे गणेश पाटील हे रात्री बारा वाजता सोसायटीच्या पार्किंगमध्ये गप्पा मारत उभे होते. याच दरम्यान चार संशयित हे गणेश पाटील यांच्या आतेभाऊ असलेल्या किरण जमदाडे यांच्यासोबत झालेल्या जुन्या वादातून मारहाण करण्यास आले होते. टोळक्याने त्यांचा भाऊ गणेश पाटील यांना किरण जमदाडेबाबत विचारपूस केली. किरण जमदाडे न भेटल्याने संशयित टोळक्याने पाटील यांच्यावर हल्ला केला. हा वाद सोडवण्याचा प्रकाश सूर्यवंशी प्रयत्न करीत असताना टोळक्याने कोयता व धारदार शस्त्राने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. जखमी झालेल्या सूर्यवंशी यांना रात्री नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शनिवारी प्रकाश सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला.