येथील ओवी सागर पुजारी (वय ७) या चिमुकलीचा ‘एसएसपीई’ (सबक्युट स्क्लेरेजिंग पेन्सेफिलाइटीस) या असाध्य व दुर्मीळ आजाराने (SSPE Disease) उपचारादरम्यान काल सायंकाळी मृत्यू झाला.
ती या आजाराशी सहा महिन्यांपासून झुंज देत होती. तिचे ग्रोवरचे लसीकरणही झाले होते.
तिला सहा महिन्यांपूर्वी चक्कर आली होती. तिच्यावर गावातच उपचार झाले; पण प्रकृतीत फरक पडला नाही. तसे वारंवार होऊ लागल्याने तिला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल केले. सर्व तपासण्यांनंतर तिला दुर्मीळ ‘एसएसपीई’ विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यावर जगामध्ये सध्या तरी कोणतेच ठोस औषध उपलब्ध नाही.
वडील सागर यांनी चीनमधून औषध उपलब्ध केल्यानंतर काही प्रमाणात प्रकृतीत सुधारणा होऊ लागली; परंतु हा दीर्घकालीन औषध उपचार असल्यामुळे यासाठी जवळपास पंधरा ते वीस लाख रुपये खर्च येणार होता. ही बाब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजली. उपमुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्य कक्षाचे मंगेश चिवटे, कोल्हापूरचे समन्वय प्रशांत साळुंखे यांच्या माध्यमातून शिंदे यांनी पुजारी यांना तातडीने बोलवून घेऊन भरीव आर्थिक मदत दिली आणि उपचार सुरू ठेवण्यास सांगितले.
गेल्या पंधरा दिवसांपासून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. चारच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉल वरून तिच्या प्रकृतीची चौकशी केली होती आणि डॉक्टरांशी संवाद साधला होता, मात्र उपचार सुरू असताना रविवारी दुपारी तिची प्रकृती अचानक खालावली आणि सायंकाळी साडेचारच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली.
लसीकरण महत्त्वाचे
एसएसपीई (सबक्युट स्क्लेरेजिंग पेन्सेफिलाइटीस) हा आजार गोवरची लस न घेतलेल्या काही मोजक्या बालकांना होऊ शकतो. सर्वांनाच होईल असे नाही. याचे प्रमाण कमी आहे; मात्र गंभीर आजार असल्याने तो टाळण्यासाठी बालकांच्या जन्मानंतर नवव्या आणि १५ व्या महिन्यात गोवर प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक आहे, अशी माहिती शासकीय बालरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर सरवदे यांनी दिली. बालसंगोपन अधिकारी डॉ. फारूक देसाई म्हणाले, ”गोवर लसीकरणाचे प्रमाण चांगले असल्याने सहसा आजार अनेकांना होत नाही गोवरचा ताप आल्यानंतरचा हा आजार होऊ शकतो; मात्र या आजाराचे प्रमाण नगन्य आहे.”
आजार व लक्षणे
‘एसएसपीई’ बालकांच्या मेंदूशी संबधित आजार
गोवरचा ताप आल्यानंतर याची लक्षणे दिसू शकतात.
मेंदूवरील नियंत्रण कमी होऊ लागते
पायांतील शक्ती कमी होते. कमरेखालचा भाग लुळा
काही अवयवांच्या कार्याची गती घटते
मुलांची स्मरणशक्ती कमकुवत होते.
तपासणी, निदान, नियमित उपचारातून सकारात्मक बदल शक्य
वडिलांची धडपड, उपमुख्यमंत्र्यांची मदत
या आजारावर औषध नसल्याचे समजल्यावरही वडील सागर यांनी जिद्द सोडली नाही. गुगलवर सर्च करून त्यांनी आजाराची माहिती घेतली आणि चीनमध्ये औषध उपलब्ध असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी थेट थायलंड गाठले आणि तेथून चीनमधून औषध घेऊन उपचार सुरू केले. या साऱ्या प्रवासात त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी मदत केली.