कोरची-कुरखेडा महामार्गावरील ढोलीगोटा देवस्थानाजवळील एका वळणावर भरधाव मालवाहू ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. यात पतीच्या डोळ्यादेखत पत्नीच्या अंगावरून ट्रक गेला.
ही घटना ३१ मे रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. रेवताबाई राजाराम उसेंडी (वय ६४, रा. जामटोला, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली) असे मृत पत्नीचे नाव आहे. पती राजाराम लालसू उसेंडी (६७) यांच्या उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
उसेंडी दाम्पत्य जामटोला गावाहून शनिवारी सकाळी नऊ वाजता दुचाकीवरून ( एमएच ३३ एल -६४२५) कोरची तालुक्यातील झगडवाही गावातील आजारी नातेवाइकास भेटण्यासाठी निघाले होते. ना बेडगाव जवळील ढोलीगोटा देवस्थानपुढील कुरखेडा-कोरची राष्ट्रीय महामार्गावरच्या वळणावर कुरखेडाला निघालेल्या अज्ञात मालवाहू ट्रकचा ताबा सुटला. ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात दोघेही खाली कोसळले.
पत्नी चाकाखाली सापडल्याने तिच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. पती राजाराम यास कोरची ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले. बेडगाव पोलिस मदत केंद्रातील उपनिरीक्षक शिवाजी ढाकरे, अंमलदार देवाजी धकाते, रतन कुमरे, चंद्रमानी जंजाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृत पत्नी रेवताबाई उसेंडी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.
मृतदेहावरून ट्रक मागे घेऊन चालक पसार
अपघातानंतर चालकाने मृतदेहावरूनच ट्रक मागे घेतला व पसार झाला. घटनास्थळी आढळलेल्या ट्रकच्या चाकांच्या खुणांवरून ही बाब पोलिसांनी ओळखली. पोलिसांनी ट्रकसह चालकाचा शोध सुरू केला आहे.
यापूर्वीही अपघात
काही महिन्यांपूर्वी याच मार्गावरील कोसमी फाट्याच्या वळणावर दामेश्वर गावातील एका महिलेच्या अंगावरून ट्रक गेला होता. त्या महिलेचा मृतदेहदेखील छिन्नविच्छिन्न झाला होता.




