Saturday, July 12, 2025
Homeइचलकरंजीजयसिंगपूर : 20 मिनिटांमध्ये खेळ खल्लास; 37 लाख रुपयांचा ऐवज लंपास

जयसिंगपूर : 20 मिनिटांमध्ये खेळ खल्लास; 37 लाख रुपयांचा ऐवज लंपास

जयसिंगपूर येथील बीएसएनएल क्वार्टर्समधील सुनीता दीपक केरीपाळे यांचे घर फोडून चोरट्यांनी 350.38 ग्रॅम सोन्याचे दागिने व 2 दोन किलो 385 ग्रॅम चांदीचे दागिने, असा 36 लाख 75 हजार 416 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला

 

गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास अवघ्या 20 मिनिटांत घटना घडली. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने याप्रकरणी राजू रामय्या महादेपल्ली (वय 46, सध्या रा. विजयवाडा, आंध्र प्रदेश) याला मुद्देमालासह ताब्यात घेत घरफोडीचा 12 तासांत छडा लावला.

 

क्वार्टर्समधील तिसर्‍या मजल्यावरील सुनीता केरीपाळे गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास दळप आणण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी चोरट्याने घराचा दरवाजा तोडून कपाटातील मँगो हार, राणी हार, मोठे मंगळसूत्र, मोहनमाळ, 2 चेन, तोडे, नेकलेस, पाटल्या, 3 अंगठ्या, मोती हार, लहान मंगळसूत्र, कुडे वेलसह टॉप्सजोड, जेटॉप्स 1 वेल असलेले, लहान मोहनमाळ, कर्णफुले जोड, मुगवट असा सोन्याचा ऐवज, तर तांब्या, 2 ताट-वाट्या, पानसुपारी, ताम्हण, फुलपात्र 2, ग्लास, पळी पंचपात्र, लहान आरती 4, करंडे 6, चांदीची घंटी, अगरबत्ती पात्र, 2 चमचे, मेखला, लहान वाटी, कडई, नारळ, पैंजण 2, 5 कॉईन, घुन खडकी 3 नग, गणपती मूर्ती हा चांदीचा ऐवज व रोख 3,500 रु., किमती मोबाईल असा मुद्देमाल लंपास केला.

 

सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिस अंमलदार महेश खोत आणि महेश पाटील यांना हा चोरटा कसबा बावडा परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून महादेपल्ली याला ताब्यात घेत कसून चौकशी केली. त्याने या घरफोडीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला.

 

केरीपाळे यांना जोराचा धक्का

 

सुनीता 20 मिनिटांनी परत आल्या. त्यांना सर्व सोने व साहित्य चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर जोराचा धक्का बसला.

 

55 लाखांची चोरीही चर्चेत

 

गेल्या 2 महिन्यांपूर्वी शहरातील एका घरात मोलकरणीने सोने, चांदी, हिरे असा 55 लाख रुपयांच्या चोरीची घटनाही सीसीटीव्हीमुळे उघडकीस आली होती. त्याचीही चर्चा होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -