लोणावळा ग्रामीण पोलिसांनी 25 मार्च रोजी दोन संशयित कंटेनर ताब्यात घेतले होते. त्या कंटेनरमध्ये जनावरांचे मांस आढळून आले होते. दोन्ही कंटेनरमधील मांसाचे नमुने हे तपासण्यासाठी पाठवण्यात आले होते. यानंतर त्या कंटेनरमध्ये असलेले मांस हे गोमांस असल्याचे स्पष्ट झाले होते. दोन्ही कंटेनरमध्ये मिळून तब्बल 57 हजार किलो गोमांस जप्त करण्यात आले होते. यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी विधान परिषदेत भाजप आमदार श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiya) यांनी लक्षवेधी मांडली. तर गृह (ग्रामीण) राज्यमंत्री पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली. तसेच यानंतर असा प्रकार समोर आल्यास मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. तर गोमांससंदर्भात लवकर कायदा आणण्यात येईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.
विधान परिषदेत श्रीकांत भारतीय म्हणाले की, 57 हजार किलो गोमांस लोणवळा येथे पकडण्यात आले आहे. हे गोमांस दुबईला पाठवण्यात येत होते. बेकायदेशीर गोमांस विक्री करण्याचे काम अशा प्रकारे सुरू आहे. यावर एसआयटी स्थापन करून चौकशी करणार आहात का? अशा बाबी करणाऱ्या लोकांवर मोक्काअंतर्गत कारवाई करणार आहात का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
…तर मोक्काअंतर्गत कारवाई करणार : पंकज भोयर
यावर राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले की, 57 हजार किलो मांस सिंहगड कॉलेज समोर पकडण्यात आले, हे गंभीर आहे. या प्रकरणातील दोन आरोपी अटकेत आहेत. आपण या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करुया आणि या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊया. यानंतर असा प्रकार समोर आला तर मोक्काअंतर्गत कारवाई करू आणि लवकरच आम्ही याबाबत कायदा आणणार आहोत, असे त्यांनी म्हटले. तर अनिल परब यांनी 57 हजार किलो मांस पकडले जात असेल तर तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणजेच पोलिस खात्याचे हे पूर्णपणे अपयश असल्याचा आरोप केला.
नेमकं प्रकरण काय?
25 मार्च रोजी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दोन कंटेनर (एमएच 46 बीएम 9180) आणि (एमएच 46 सीयू 9966) तसेच त्यांच्या चालकांना ताब्यात घेतले. चालकांची नावे नदीम कलीम अहमद आणि नसीर मोहंमद अहमद (दोघेही रा. न्हावाशेवा, नवी मुंबई) अशी आहेत. हे दोन्ही एअर कंडिशनर कंटेनर मे. एशियन फूड्स मीन अँग्रो, न्यू भोईबुडा, सिकंदराबाद (हैदराबाद) येथून मांस भरून न्हावाशेवा पोर्ट, मुंबई येथे ट्रान्स्पोर्टसाठी रवाना झाले होते. पुण्यातील एका गोरक्षकाने याबाबत माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर, ग्रामीण पोलिसांसह लोणावळा शहरातील गोरक्षक व विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हे कंटेनर अडवले.
सुरुवातीला चालकांनी कागदपत्रे दाखवत सदर मांस गोमांस नसून म्हशीचे मांस असल्याचे सांगितले. संबंधित कागदपत्रेही पोलिसांना सादर करण्यात आली. मात्र, गोरक्षक संघटनांनी ही कागदपत्रे संशयास्पद असल्याचे सांगून, मांसाची तपासणी झाल्याशिवाय कंटेनर सोडू नये, अशी मागणी केली. त्याअनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मांसाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आणि तपासणी अहवाल येईपर्यंत कंटेनर ताब्यात ठेवण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. 29 मार्च रोजी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालात, सदर कंटेनरमध्ये असलेले मांस गोवंशीय असल्याचे निष्पन्न झाले होते.